मुंबई : आयएल अँड एफएस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी झाली. अंमलबजावणी संचालनालयाने जयंत पाटील त्यांची साडे नऊ तास चौकशी झाली. त्यानंतर त्यांची विविध पक्षातील लोकांनी विचारपूस केली. परंतु पक्षातून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. ईडीची चौकशी सुरु असताना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीने आंदोलन केले. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यावेळी एकच राष्ट्रवादीचा नेता दिवसभर उपस्थित होता. बाकीच्या बड्या नेत्यांनी मात्र दांडी मारल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादीत संघर्ष आला समोर
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा सुरु आहे. जयंत पाटील यांची ईडीची चौकशी लागली त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चा सांभाळला. दिवसभर ते त्याठिकाणी हजर होते. मात्र राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात एकही वरिष्ठ नेता नव्हता. यामुळेच, ईडी चौकशीदरम्यान जयंत पाटील पक्षात एकाकी पडलेत का, अशी चर्चा सुरू झाली.
फोन आला नाही
जयंत पाटील यांना कोणाचे फोन आले, असे विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, अनेक जणांचे मला फोन आले. फोन आलेल्यापैकी कोणाचंही नाव घेणार नाही. कारण काही नाव सुटून जाण्याची शक्यता आहे. यामुळे एखादे नाव राहिलं तर चूक होईल. यामुळे मी कोणत्याही नेत्याचे नाव घेत नाही. त्यावेळी त्यांना अजित पवार यांचा फोन आला होता का, असा प्रश्न विचारला. त्यावर जयंत पाटील यांनी सरळ उत्तर दिले. नाही, अजित पवार यांचा फोन आला नाही. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येत अंतर्गत संघर्ष सुरु आहे का? अजित पवार नाराज आहेत का, अशी चर्चा सुरु आहे.
ठाकरे गटाकडून फोन
जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांनीही फोन करुन चौकशी केली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आमचा जयंत पाटील यांना पाठिंबा असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. परंतु पक्षातील मोठ्या नेत्यांकडून चौकशी झाली नसल्याचे स्पष्ट झाले.
पवारही म्हणाले होते
जयंत पाटील यांच्या चौकशीबद्दल शरद पवार यांनी सोमवारी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, जयंत पाटील यांची पूर्ण माहिती माझाकडे नाही. पण महाराष्ट्रात चांगले काम करणारे प्रशासक असे जयंत पाटील यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना कशासाठी बोलावलं यात कमीपणा नाही. ईडी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर कसा होतो याच हे उदाहरण आहे.