मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल जाहीर केला. विधानसभा अध्यक्षांनी निकाल जाहीर करताना उपमुख्यंत्री अजित पवार यांचा गट हा मूळ पक्ष आहे, असा निर्वाळा दिला. तसेच त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालावर शरद पवार गटाकडून टीका केली जात आहे. या निकालात शरद पवार गटाला धक्का मिळाला आहे. त्यामुळे आता शरद पवार गट काय पावलं उचलणार? याबाबत त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
“संघटनात्मक निवडणुका झाल्या. 2018 ला झाल्यानंतर 2022 ला कोरोना संकट होतं. कोविडची परिस्थिती सुधारल्यानंतर पक्षांतर्गत निवडणुका सुरु झाल्या. राष्ट्रीत पातळीवर निवडणुका झाल्या. शरद पवार यांची अध्यक्ष पदाची निवडणूक झाली. महाराष्ट्रात ज्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया आहे ती काही जिल्ह्यांत पूर्ण झाली. पण आमच्या पक्षाच्या घटनेतच असं आहे की, जोपर्यंत नवीन निवडणूक होत नाही तोपर्यंत जुने पदाधिकारी हे कार्यरत असतात”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
“विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या निकालात कुणालाही अपात्र ठरवलं नाही. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्ष कुणाचा याबाबत निर्णय दिला. पक्ष फक्त विधानसभेच्या सदस्याच्या जीवावर होऊ शकतो हा नवा प्रकार या निर्णयात दिसतोय. मला खात्री आहे की, सुप्रीम कोर्ट हे मान्य करणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाई केसवर आधीच भाष्य केलेलं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
“दोन्ही गटांपैकी कुणालाही अपात्र न करणं हा मध्यम मार्ग स्वीकारलेला दिसतोय. कारण या प्रकरणी कुणाला अपात्र केलं तर ते सुप्रीम कोर्टात जातील आणि सुप्रीम कोर्ट कदाचित त्यांना म्हणेल, तुमची घाई आहे तर या. पण आता कुणालाच अपात्र केलेलं नाही. त्यामुळे नो इमर्जन्सी, असादेखील उद्देश असू शकतो. अपात्र झालं तरी परत निवडणुकीला उभं राहता येतं”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.
“सुप्रीम कोर्ट दहाव्या परिशिष्ठाबाबत आगामी काळात महत्त्वाचा निर्णय देईल, असं वाटतं. दहावं शेड्यूल कशासाठी आहे? लोकप्रतिनिधी अपात्र कधी होतात, याची व्याख्या दहाव्या शेड्यूलमध्ये केली आहे. आता तशी कृती एखाद्याने केलीय तर दहाव्या शेड्यूलचा वापर त्यानंतर केला आहे. त्यामुळे कुणाला धमकवण्याचा प्रश्नच नाही. एखाद्याने गुन्हा केल्यानंतर ते शेड्यूल त्याला दाखवून, तू अपात्र होणार असं सांगणं चुकीचं नाही. आम्ही 2 जुलैच्याआधी दहावं शेड्यूल सांगत नव्हतो. त्यांनी केलेल्या कृत्यानंतर आम्ही दहाव्या शेड्युलनुसार याचिका दाखल केली होती. पक्षाची रितसर बैठक व्हायला पाहिजे. पक्षाच्या अध्यक्षांना बोलवून बैठक व्हायला पाहिजे. माणसं बोलवायचं आणि सही घ्यायचं, बहुतेकांना सही कशासाठी घेतली ते माहिती नव्हतं असा जबाब विधानसभा अध्यक्षांसमोर दिला आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.