मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीने (ED) टाच आणलीय. त्यावरून राज्यात नवा वाद सुरू झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त करण्याअगोदर त्यांना कल्पना देणे आवश्यक होते. मात्र संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे, त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर जयंत पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केंद्रीय यंत्रणांच्या वापरावर आपले मत नोंदवले आहे. सर्वोच्च न्यायधीशांनीच असं मत व्यक्त केले असेल तर हे जगजाहीर आहे की, या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर व्हायला लागलेला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
किरीट सोमय्या बोलतात आणि दोन तीन दिवसांनी कारवाई होते त्यामुळे ‘ॲक्युरेट प्रेडीक्शन’ करणारे गृहस्थ म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रात आहे असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. केंद्रसरकारच्या केंद्रीय यंत्रणा कोणतीही कारवाई करण्याअगोदर त्याची कल्पना किरीट सोमय्या यांना देतात आणि त्यांना कल्पना देऊनच कारवाया करतात असा आभास तयार झाला आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. या सगळ्याचा सरकारवर परीणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकार व सरकारमधील संबंधित लोकांना बदनाम करण्यासाठी या यंत्रणा वापरल्या जात आहेत. सरकारबद्दल संशय व शंका निर्माण करण्यासाठी या यंत्रणांचा वापर होत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
खासदार संजय राऊत यांची ईडीने मालमत्ता जप्त केली आहे याचा अर्थ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं. नेत्यांवर सुड उगवायचा ही गोष्ट लोकशाही दृष्टीकोनातून योग्य नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यावर महेश तपासे यांनी संताप व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारची अजून एक मुलुखमैदान तोफ संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली अशी बातमी वाचली. काय चाललंय? असा संतप्त सवाल महेश तपासे यांनी केला आहे.
Raju Shetty : आधी आमदाराला बाहेरचा रस्ता, आता महाविकास आघाडीला रामराम! स्वाभिमानीत नेमकं काय घडतंय?