इंधन दरवाढ, महागाईचा भडका, हे तर केंद्राचं रिटर्न गिफ्ट; जयंत पाटलांचा खोचक टोला

| Updated on: Jun 01, 2021 | 3:14 PM

देशातील वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. (jayant patil slams bjp over fuel hike and economy slowdown)

इंधन दरवाढ, महागाईचा भडका, हे तर केंद्राचं रिटर्न गिफ्ट; जयंत पाटलांचा खोचक टोला
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई: देशातील वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई, इंधन दरवाढ आणि मायनसमधील जीडीपी, हे तर केंद्राने दिलेलं रिटर्न गिफ्ट आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे. (jayant patil slams bjp over fuel hike and economy slowdown)

जयंत पाटील यांनी ट्विट करून ही खोचक टीका केली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षांतील भारताचा विकास दर उणे (-) 7.3 टक्के नोंदवला गेला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्रसरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन नाही

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारचे कोणतेही नियोजन नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर जात आहेत. देशाचा जीडीपी मायनसमध्ये आहे. महागाईचा नुसता भडका उडाला आहे असे सांगतानाच मोदी सरकारने जनतेला या रुपात रिटर्न गिफ्ट दिले आहे, असं ते म्हणाले.

40 वर्षांतील निराशाजनक कामगिरी

सोमवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या 40 वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. कोरोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा 2020-21 या आर्थिक वर्षांतील विकासदर (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे (-) 7.3 टक्के नोंदवला गेलाय. चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे 1979-80 या वर्षांत आर्थिक विकासदराची उणे 5.2 टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकासदर उणे 7.3 टक्क्यांवर घसरला आहे, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्याचीही कबुली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचं मान्य केलं आहे. देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही झालाय. कोरोनाच्या संकटामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन पॅकेजची मागणी केली जात आहे. सरकार अशा अनेक योजना यापूर्वीच चालवित आहे, ज्या पूर्ण अंमलात आणल्या गेल्या, तर सर्व समस्या सोडवू शकतात, असं सीतारामन म्हणाल्या. गरज भासल्यास यंदाच्या अर्थसंकल्पात मनरेगाचा निधी पुन्हा वाढविण्यात येईल. कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यामुळे कामगार परत येत आहेत. ते त्यांच्या क्षमतेनुसार काम आणि पैसे विचारत आहेत. कोरोनाची दुसरी लाट अर्थव्यवस्थेवर किती परिणाम करेल, याचा अंदाज लावण्यासाठी सध्या मूल्यांकन केले जात आहे, असंही त्या म्हणाल्या होत्या. (jayant patil slams bjp over fuel hike and economy slowdown)

 

संबंधित बातम्या:

कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर किती परिणाम?, खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस काल शरद पवारांच्या निवासस्थानी, आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी!

…तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही; पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांचं वक्तव्य

(jayant patil slams bjp over fuel hike and economy slowdown)