‘एससी, एसटी आणि ओबीसींचा निधी थांबवला, अजित पवार सर्वात जातीयवादी’, आव्हाडांचा गंभीर आरोप

| Updated on: Feb 16, 2024 | 6:54 PM

"जो नाही झाला काका, बहीणीचा, काकींचा, तो काय होणार महाराष्ट्राचा? अजित पवार उत्तरे आम्हालाही देता येतात. फक्त तुम्ही शरद पवार यांच्यावर बोलणं थांबवा. तुम्ही जेवढे थुंकत आहात तेवढं तुमच्याच तोंडावर पडत आहे", अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

एससी, एसटी आणि ओबीसींचा निधी थांबवला, अजित पवार सर्वात जातीयवादी, आव्हाडांचा गंभीर आरोप
Follow us on

मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “अजित पवार यांनी एससी, एसटी आणि ओबीसी या सगळ्यांचा निधी थांबवण्याचं काम अजित पवार यांनी केलं”, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. “अजित पवार सर्वात जातीयवादी माणूस आहे”, असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी केला. “खासदार प्रफुल्ल पटेल यांना का उमेदवारी देण्यात आली ते बघा ना. कारण खासदारकीसाठी बरेच जण शर्यतीत आहेत. नाशिकचा एका आमदाराला खासदार व्हायचं होतं. वंशाला व्हायचं होतं. म्हणून प्रफुल्ल पटेल यांना निवडण्यात आलं. पक्षातील भाई कोण तर प्रफुल्ल पटेल”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

“तुमची सर्व बदनामी पक्षाला हानीकारक होती. पण शरद पवार यांनी चुका पोटात घातल्या आणि तुम्हाला संधी दिली. तुम्ही कुठे कुठे बोलत होता, मुतायला निघाला होतात. पण तरीही सगळं माफ करुन तुम्हाला सर्व महत्त्वाची पदे दिली. ती शरद पवारांची चूक होती. एससी, एसटी आणि ओबीसी या सगळ्यांचा निधी थांबवण्याचं काम अजित पवार यांनी केलं. सर्वात जातीयवादी माणूस अजित पवार”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला.

‘हे आम्हाला माहिती नाही का?’

“काय सारखं-सारखं वंश करताय. तुमच्यासारख्या चुका जितेंद्र आव्हाड यांनी केल्या असत्या तर त्यांना पक्षातून हाकललं असतं. शरद पवार गट तुमच्या हातात असताना तुम्ही त्या सगळ्याचे तुकडे केले. तुमचे आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचे किती सुमधुर सबंध होते हे आम्हाला माहिती नाही का?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

‘तुमची पातळी दिवसेंदिवस जास्त घसरत चाललीय’

“तुम्ही ते सेल्फी काढतात ते सांगता ना, त्यासाठी हिंमत आणि आपलेपणा लागतो. रस्त्यात उतरावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं. सामान्य माणसाला है धैर्य तुमच्यासमोर येण्याचं होतंच नाही. तो सामान्य माणूस आपलेपणाने सुप्रिया ताईंच्या बाजूने येतो आणि फोटो काढून घेतो. हा तुमच्यातला तुसडेपणा आणि ताईंमधला आपलेपणा हे महाराष्ट्राला चांगलं माहीत आहे. तुमची पातळी दिवसेंदिवस जास्त घसरत चालली आहे”, अशी टीका आव्हाडांनी केली.

“जो नाही झाला काका, बहीणीचा, काकींचा, तो काय होणार महाराष्ट्राचा? अजित पवार उत्तरे आम्हालाही देता येतात. फक्त तुम्ही शरद पवार यांच्यावर बोलणं थांबवा. तुम्ही जेवढे थुंकत आहात तेवढं तुमच्याच तोंडावर पडत आहे. अध्यक्ष झालात, पक्षाच्या भल्यासाठी काय निर्णय घेतला? जरा, झारखंड किंवा नागालँडमध्ये जाऊन भा,ण करा. शरद पवारांनी यूएनओमध्ये भाषण केलंय. ते सुद्धा इंग्रजीत, तेही दीड तास. ते शरद पवार आहेत. त्यांच्यासोबत तुलना करु नका. तुम्ही त्यांच्यासमोर एक सेंटीमीटर आहात”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.