‘अजित दादा भाषणाच्यावेळी बाथरुममध्ये पळायचे’, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

| Updated on: Feb 16, 2024 | 7:22 PM

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. "तुम्ही स्टेजवरुन नेहमी पळून जायचे. भाषणाची वेळ आली की नेमके तुम्ही बाथरुममध्ये असायचे. कारण तुम्हाला हिंदी बोलायला येत नाही. इंग्रजी बोलता येत नाही. हे तुमचे लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहिती नव्हत्या. आता आम्हाला सांगावं लागेल", अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

अजित दादा भाषणाच्यावेळी बाथरुममध्ये पळायचे, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
Follow us on

मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. अजित पवार हे दिल्लीत हिंदीत भाषण करायचं असल्याने ते भाषणाच्या वेळी बाथरुममध्ये पळायचे, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. “तुम्ही स्टेजवरुन नेहमी पळून जायचे. भाषणाची वेळ आली की नेमके तुम्ही बाथरुममध्ये असायचे. कारण तुम्हाला हिंदी बोलायला येत नाही. इंग्रजी बोलता येत नाही. हे तुमचे लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहिती नव्हत्या. आता आम्हाला सांगावं लागेल. जेव्हा दिल्लीत भाषणाची वेळ यायची तेव्हा तुम्ही बाथरुममध्ये असायचे. जेव्हा शरद पवार यांची प्रसिद्धी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खालून पिन मारुन पंचायत करुन टाकायचे. राजीनामा द्यायचे. काहीतरी वेगळं विचित्र करायचे. एमएससी बँकमध्ये तुम्ही केलेले लोच्चे, आलं शरद पवार यांच्यावरती. आणि मग तुम्ही राजीनामा दिला. मग कशाला नाटकं केली?”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली.

“तुम्हाला चार वेळा जे उपमुख्यमंत्रीपद मिळालं ते केवळ शरद पवार यांच्यामुळे मिळालं. याचा मनात उपकार तर ठेवा. कृतज्ञता तर व्यक्त करा. इतका कृतघ्न माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेलाच नाही. परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं? मी तुमच्या भावाचा मुलगा होतो ना? अरे तू त्यांच्या भावाचा मुला होतास म्हणूनच तू उपमुख्यमंत्री झालास. तू त्यांच्या भावाचा मुलगा होतास म्हणूनच तुला माफ केलं. आमच्यासारख्या मागास जातीच्या जितेंद्र आव्हाडने असं काही केलं असतं ना आमच्या मागच्या भागावर लाथ मारुन हाकलून दिलं असतं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

’84 वर्षांच्या म्हाताऱ्याला तुम्ही असं टोचून बोलणार असाल तर…’

“अजित पवार आपल्या बोलण्याला मर्यादा ठेवा. तुम्हाला वाटत असेल की, मी फार लोकप्रिय आहे. 84 वर्षांच्या म्हाताऱ्याला तुम्ही असं टोचून बोलणार असाल तर ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या बापासमोर मानही न उचलणारी पोरं आजही महाराष्ट्रात आहे. आजही असे पुतणे आहेत जे काकासमोर मानही उचलत नाहीत. तुम्ही तर काकाचं आयुष्य बरबाद करायला निघालात. महाराष्ट्राला आज खरं सांगा ना. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव मिळाल्यानंतर तुम्ही कोर्टात जावून ते रद्द करा, अशी मागणी नाही केली? तुम्हाला शरद पवार हे नावच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नकाशातून काढायचं आहे”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“तुमच्या डोक्यातील विष हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. तुम्हाला एवढंच प्रेम असतं ना, तर मग तुम्ही काकाच्या हातून पक्ष काढला नसता. सांगितलं असतं की, साहेब हा पक्ष तुमच्याकडे ठेवा. मी वेगळा मार्ग स्वीकारतोय. तुम्ही वेगळा पक्ष काढला असता. तुमचं नातं रक्ताचंच नातं होतं ना, मग या रक्तात विष का टाकलं?”, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.