मुंबई | 29 डिसेंबर 2023 : अयोध्येतील श्रीराम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य असणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण अनेक दिग्गजांना देण्यात आलं आहे. पण अजूनही विरोधी पक्षातील बडे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठी मागणी केली आहे. “देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दलित महिला आहेत. त्यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन करा”, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. खरंतर द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत. पण जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा उल्लेख दलित समाजाच्या असा केला आहे.
“आमंत्रण देणारे हे कोण? हे काय मंदीराचे मालक झालेत का? रामाचा 7/12 काय यांच्या बापाच्या नावावर आहे का? राम पूर्ण देशांचा आहे. राम हा शब्द प्रत्येकाच्या मनात आहे. हे रामचे जे मार्केटींग करतात ना, ते निवडणूका आल्याकी त्यातील हा प्रकार आहे. तुम्ही कोण राम मंदीराचे निमंत्रण देणारे? आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही अयोध्येत जाणार, छाती ठोकपणे जाणार. हीच ती लोकं आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला विरोध केला”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
“तुम्ही महात्मा फुलेंना मारण्याचाही प्रयत्न करणार, तुम्ही शाहू महाराजांच्या हत्येची सुपारीही देणार, तुम्ही आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसून शिकायला लावणार, त्याच आंबेडकरांना मनुस्मृती जाळून स्त्रीयांच्या सन्मान केला. राम मंदीराचे तुम्ही मालक नाहीत आणि राम तुमचा नाही. राम मंदीराचे उद्घाटन करायचे असेल तर राष्ट्रपती दलित महिला आहेत, त्यांच्या हस्ते करा. नवीन पार्लमेंटच्या पुजेला एकाही महिलेला निमंत्रण दिले नाही. देशातून जातीवाद कधी संपणार? आमंत्रणाचे काय नाटक आहे? आम्ही रामाचे दर्शन घ्यायला जाणार, बघू आम्हाला कोण थांबवतं ते, या देशात आता रामाच्या दर्शनापासून आम्हाला वंचित ठेवू शकत नाही. आमचा बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जय श्रीराम,.. pic.twitter.com/leesAoJK66
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 29, 2023
जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य आणि देशाच्या राजकारणातील सध्याच्या अनेक घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट झाली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीबाबत जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला. “दोघांनाही एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो. मनसे युतीत शामिल होईल का नाही याच्याशी मला काही देणेघेणे नाही. मी दुसऱ्याच्या घरात डोकवत नाही”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत सुरु असलेल्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. “ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होईल आणि जागावाटपाबाबत चर्चा करतील. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करुन घ्यावं ही विनंती”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.