मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्याला कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचा दावा केलाय. विशेष म्हणजे या दाव्यानंतर ते मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले. त्यामुळे जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाल्याची चर्चा होती. पण जितेंद्र आव्हाड यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलो नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच आपण मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पत्रकारांवरही संताप व्यक्तव केला.
“पहिली गोष्ट म्हणजे हे तुम्हाला कुणी सांगितलं की, मी सह्याद्री अतिथीगृहात आलो तर मुख्यमंत्र्यांना भेटलोच पाहिजे? कम्पलशन आहे का?”, असा प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.
“मी माझ्यावर कलम 254 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर फक्त एकदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आलेलो. त्याच्याही तुम्ही बातम्या चालवल्या. पण तेव्हाही मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विचारलं होतं की, साहेब मी असा कोणता गुन्हा केला होता की ज्यामुळे तुम्ही माझ्यावर 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता? त्यानंतर मी त्यांना भेटलोही नाही”, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
“तसं काही माझं कामच नसतं. माझं ते कामच नाहीय. मी सह्याद्री अतिथीगृहात भूषण गगरानी यांना भेटायला आलो होतो. ते अर्बन डेव्हलोपमेंटचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत. त्यांच्याकडे माझं अर्बन डेव्हलोपमेंटचं काम होतं. त्यासाठीच मी सह्याद्री अतिथीगृहावर आलो होतो, मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेलो नाही”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
‘मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली . जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेमकं कोणत्या गुन्ह्याअंतर्गत अटक होईल, याबाबतची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही. पण केंद्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन आखण्यात आल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
“मी धक्कादायक माहिती महाराष्ट्राला देऊ इच्छितो. केंद्रातील काही अधिकाऱ्यांनी मला सूचक माहिती दिलीय. ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या कानावर घातलंय की, कुठल्याही परिस्थितीत तुला अटक केली जाईल”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“निदान ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत आणि त्यानंतरचे काही महिने तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. तसं माझ्या विरोधात एकही केस नाही. पण ही जेव्हा बातमी येते तेव्हा आश्चर्य वाटतं”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.