मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : “भाषणं करायला अभ्यास लागतो. भाषणं करायला माहिती लागते. मांडणी लागते. ते विरोधी बाकावर येऊन भाषणं करायचे. काय भाषणं करायचे? तुमचा पीए लिहून द्यायचा. त्यामध्येसुद्धा विरोधी पक्षावर जी महत्त्वाची टीका आहे ती तुम्ही बाजूला काढून घ्यायचे. सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षनेते होते. सत्ताधारींचे लीडर नव्हते. सत्ताधाऱ्यांच्यी टीपांवर वागणारा विरोधी पक्षनेता म्हणजे अजित पवार. त्यांनी दिलेली टीप तुम्ही बरोबर सकाळी मांडायचे आणि विरोधी पक्षाचा चाललेला गाढा बरोबर वळवून टाकायचे. सत्ताधारी अडचणीत येणार नाहीत याची व्ह्यूरचना कोण करायचं? विरोधी पक्षनेते अजित पवार. तुमच्या प्रत्येक वर्तवणुकीचे आम्ही साक्षीदार आहोत”, अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.
“आमच्या काय पोटात दुखतंय? तुम्ही कायदेशीररित्या निवडणूक लढवायला पाहिजे होती. तुम्ही तर स्टेजवरुन नेहमी पळून जायचे. भाषणाची वेळ आली की नेमके तुम्ही बाथरुममध्ये असायचे. कारण तुम्हाला हिंदी बोलायला येत नाही. इंग्रजी बोलता येत नाही. हे तुमचे लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहिती नव्हत्या. आता आम्हाला सांगावं लागेल. जेव्हा दिल्लीत भाषणाची वेळ यायची तेव्हा तुम्ही बाथरुममध्ये असायचे. जेव्हा शरद पवार यांची प्रसिद्धी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खालून पिन मारुन पंचायत करुन टाकायचे. राजीनामा द्यायचे. काहीतरी वेगळं विचित्र करायचे. एमएससी बँकमध्ये तुम्ही केलेले लोच्चे, आलं शरद पवार यांच्यावरती. आणि मग तुम्ही राजीनामा दिला. मग कशाला नाटकं केली?”, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला.
“तुम्हाला चार वेळा जे उपमुख्यमंत्रीपद मिळालं ते केवळ शरद पवार यांच्यामुळे मिळालं. याचा मनात उपकार तर ठेवा. कृतज्ञता तर व्यक्त करा. इतका कृतघ्न माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेलाच नाही. परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं? मी तुमच्या भावाचा मुलगा होतो ना? अरे तू त्यांच्या भावाचा मुला होतास म्हणूनच तू उपमुख्यमंत्री झालास. तू त्यांच्या भावाचा मुलगा होतास म्हणूनच तुला माफ केलं. आमच्यासारख्या मागास जातीच्या जितेंद्र आव्हाडने असं काही केलं असतं ना आमच्या मागच्या भागावर लाथ मारुन हाकलून दिलं असतं. हे सगळं बोलायलाही वाईट वाटतं. एवढे वर्ष काम केलं. पण एवढं वर्ष काम करुनही या माणसाला शरद पवारांची ओळख पटली नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“काय ते बा बा बा, मग का का का, काल समजवून सांगितलं की, का म्हणजे कारखानदार, का म्हणजे कापूस. सगळे का समजावून सांगितलं. तुम्ही 35 वर्षांच्या आयुष्यातील एक निर्णय असा सांगा की तो महाराष्ट्राला आवडला, महाराष्ट्राने त्या निर्णयाने तुमचा गौरव केला, असा एक निर्णय सांगा. तुम्हाला 48 तास देतो. एक निर्णय सांगा. महाराष्ट्रात काय केलं ते सांगा. अर्थ नियोजन खात्यात तुम्ही क्रांतीकारी केलं असा निर्णय सांगा. तुमच्या भागात येणारा सीएसआर फंड कोण आणतं ते सांगा. हे सगळे कारखानदार शरद पवारांचे मित्र आहेत ते पाठवतात”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं.