मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत असं आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा देशात एकही नेता नसल्याचं आपण म्हणतो. पण त्यांना राज्यात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. दिलीप वळसे पाटील यांचा हा हल्ला शरद पवार गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका करतानाच वळसे पाटील यांच्या निष्ठेवरच बोट ठेवलं आहे.
हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही याचं आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार निवडून आणू शकले नाही. अन् शरद पवारांबद्दल बोलत आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
वळसे पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही…पण शरद पवारांसाठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांविषयी यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही. क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल, असा हल्लाच आव्हाड यांनी चढवला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही शरद पवार यांची साथ सोडली. त्यांचा पक्ष सोडला. त्यांचे विचारही सोडले. तुम्हाला त्यांच्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल करतानाच राष्ट्रवादीचा स्वबळावर मुख्यमंत्री बनला नाही. त्याला तुम्हीही जबाबदार नाहीत का? तुम्ही काय करत होता? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.