कल्याण लोकसभा मतदार संघात दोन दिवसांपूर्वी मोठी घडामोड घडली होती. ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांच्या पाठोपाठ आणखी एक उमेदवार दिला गेला होता. महायुतीमधील शिवसेना उमेदवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना टक्कर देण्यासाठी नवीन खेळी खेळली गेली होती. कल्याणमधून माजी महापौर रमेश जाधव यांचाही अर्ज ठाकरे गटाकडून दाखल झाला होता. यामुळे वैशाली दरेकर की रमेश जाधव कोण उमेदवार असणार? हा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर हा सस्पेन्स संपला आहे. रमेश जाधव यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशीच लढत रंगणार आहे.
उद्धव सेनेकडून कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर ३ मे रोजी मोठे ट्विस्ट करण्यात आले. ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवार रमेश जाधव यांनी अर्ज भरला. छाननीमध्ये ठाकरे गटाच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामुळे कोणता उमेदवार माघार घेणार? यावर चर्चा सुरु झाली होती. अखेर सोमवारी रमेश जाधव दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहचले. त्यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे उद्धव ठाकरे यांची कल्याणची रणनीती स्पष्ट झाली. ठाकरे गटाने उमेदवार बदलला नाही.
दिंडोरी लोकसभा मतदार संघातून भाजपला चांगली बातमी आली आहे. या ठिकाणावरुन माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेतली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांना त्यांचे मन वळवण्यात यश आले आहे. भारती पवार विरोधात बंडखोरी करत त्यांनी अर्ज भरला होता.
शिवसेना उबाठामधून शिंदे सेनेत प्रवेश करणारे विजय करंजकर यांनीही नाशिक लोकसभा मतदार संघातून माघार घेतली आहे. काल शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आज माघार घेत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी तिकीट कापल्यामुळे बंडखोरी करत करंजकरांनी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.