मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना कथित खिचडी घोटाळा भोवण्याची चिन्हे दिसत आहे. अमोल कीर्तिकर यांची काल आर्थि गुन्हे अन्वेषण विभागाने ( ईओडब्ल्यू) ने पाच तास कसून चौकशी केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अमोल कीर्तीकर हे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव आहेत. मात्र, अमोल हे उद्धव ठाकरे गटात आहेत. कोरोना काळात प्रवाशाना डाळ खिचडी वितरण करण्याचे कंत्राट एका कंत्राटदाराला मिळाले होते. मुंबई महापालिकेने हे कंत्राट दिले होते. त्यात घोटाळा झाल्याने अमोल यांची चौकसी करण्यात आली आहे.
अमोल कीर्तिकर यांनी कंत्राटदाराला खिचडी वितरणाचं कंत्राट मिळवून दिल्याचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला संशय आहे. कॅगने या प्रकरणात 12,024 कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ईओडब्ल्यूने हे पाऊल उचललं आहे. गेल्याच महिन्यात ईओडब्ल्यूने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना याच प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं होतं.
त्यानंतर ईडब्ल्यूओने या प्रकरणी काल अमोल कीर्तिकर यांनी चौकशीसाठी बोलावलं. सकाळी 11.30 अमोल हे दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील ईओडब्ल्यूच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी त्यांची पाच तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणी अमोल यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली होती.
खिचडी घोटाळ्याप्रकरणी 1 सप्टेंबरमध्ये महापालिका अधिकारी आणि काही खासगी व्यक्तींच्या विरोधात ईओडब्ल्यूने गुन्हा दाखल केला होता. कोरोनाच्या काळात या लोकांनी खिचडी वितरणाच्या नावाखाली 6.37 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. षडयंत्र रचून बेकायदेशीरपणे कामगारांसाठी खिचडी बनवण्याचं कंत्राट मिळवण्यात आलं होतं. मात्र, कंत्राट मिळाल्यानंतर ठेकेदाराने हे कंत्राट दुसऱ्या व्यक्तीला दिलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या कथित घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर, सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्स वन मल्टी सर्व्हिसचे भागीदार आणि कर्मचारी, तसेच स्नेहा कॅटररचे भागीदार आणि सहायक नगर आयुक्त (नियोजन) आणि इतर काही महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती.