मुंबईः आयएनएस विक्रांतप्रकरणी मी काही घोटाळा केल्याचा संशय असेल, तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोप करण्यापेक्षा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुरावे द्यावेत. उगीच या प्रकरणात टाइमपास करून वेळ वाया घालवू नये, असे आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी बुधवारी दिले आहे. संजय राऊत यांच्या मालमत्तेवर मंगळवारी ईडीने टाच आणली. त्यानंतर शिवसेना आणि भाजप विरोधातल्या कुरघोडीच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे. आज सकाळीच संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा आरोपांची राळ उडवून दिली. त्यात त्यांनी विशेषतः भाजपचे नेते किरीट सोमय्यांचे विविध आरोप करून वस्त्रहरण केले. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. मात्र, हे पैसे जमा केलेच नाहीत, असा दावा राऊत यांनी केला. त्याला तात्काळ किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. या अतिशय महत्त्वाच्या आणि टोकाच्या विरोधाचा राजकीय सवाल-जबाब जाणून घेऊयात.
संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी पैसे जमावले. कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसी दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. मात्र, हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणा पारदर्शक असतील, तर त्यांनी या घोटाळ्याची चौकशी करावी. विक्रांतसाठी जमा केलेली रक्कम कुठे गेली, याचा छडा लावावा, असे आव्हान त्यांनी दिले. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी विक्रांतवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील देणगी दिली आहे. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही संजय राऊतांनी यावेळी केली.
संजय राऊतांच्या आरोपाला किरीट सोमय्यांनी जोरदार उत्तर दिले. सोमय्या म्हणाले की, ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत गोंधळलेले आहेत. किरीट सोमय्याने काही केले असेल, तर त्याचे पुरावे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावे. त्यांनी अनेक आरोप केले. मात्र, त्यांना पुरावे मिळालेच नाहीत. ते फक्त टाइमपास करू इच्छितात. संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या एका कंपनीविरोधात भारत सरकारने कालच मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केलाय. ही कंपनी जानेवारी 2021 मध्ये बनवली. दोन महिन्यांत परवानगी मागितली, कोविड कामे मिळवली, असा आरोप त्यांनी केला.