मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी तिरुपतीला पायी जाणाऱ्या सुमंत रुईकर या शिवसैनिकाचा (Shivsena) रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबाला दत्तक घेतले. मंत्री एकनाथ शिंदे यांनी घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रुईकर यांच्या घराचे भूमिपूजन होणार आहे. याच भूमीपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थित राहावे यासाठी सुमंत रुईकर यांच्या पत्नी कीर्ती रुईकर (Kirti Ruikar) यांनी भावनिक पत्र लिहिलं आहे.
या पत्रामध्ये कीर्ती रुईकर यांनी लिहिले आहे की, साहेब मी तुमच्या निष्ठावंत व खंद्या समर्थक असलेल्या स्वर्गीय सुमंत रुईकर यांची पत्नी. हालाकीच्या परिस्थितीत संसार करतानाही माझ्या पतीने शिवसेनेवरची निष्ठा व ठाकरे कुटूंबावरची श्रद्धा कमीच होऊ दिली नाही. या त्यांच्या या निष्ठेला अनेक जण वेडेपणा समजायचे. जगण्यासाठीचा संघर्ष करताना अनेकदा मलाही ही निष्ठा व श्रध्दा अडचणीची वाटायची. पण, ते स्वाभिमान व अस्तित्वाचं महत्व सांगत, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सांगत त्यावेळी काळजी गळून पडायची. त्यापुढे लिहितात की, त्यांच्या निधनामुळे सगळाच त्राण निघून गेला सगळं संपले आहे असं वाटून डोळ्यासमोर अंधार दाटून आला.
मुलांचे अंधकारमय दिसणारे भविष्य यामुळे माझ्या जगण्याची हिम्मतच निघून गेली. सगळी परिस्थितीच अस्वस्थ करणारी होती. मात्र यावेळी तुम्ही आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या जगण्याचा आधार बनलात. मदत दिली. आपुलकीनं आणि आपलेपणानं शिवसैनिकांनी दुःख वाटून घेतले त्यामुळे हिम्मत आली. त्यापुढे जाऊन त्या म्हणतात या शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांवरच्या निष्ठेमुळेच खरं तर मला जगण्याची ताकद मिळाली अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच कीर्ती रुईकर पत्रात लिहितात की, तुमच्या पाठिंब्यामुळे जगण्याला बळ मिळाले आहे. माझ्या मुलांचे पितृछत्र हरवले असले तरी त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी मायेच्या छताचा आधार दिला आहे, त्यांच्यामुळेच खरंतर आम्हीला जगण्याला बळ मिळाले आहे. 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याजयंतीच्या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे की, उभा राहत असलेल्या घराचे भूमिपूजन तुमच्या हाताने करा. तुमची मुलगी म्हणून एवढीच माझी इच्छा असल्याची त्यांनी म्हटले आहे. सध्या उद्धव ठाकरे यांची तब्बेत बरी नाही त्यामुळे त्यांनी त्यांना ऑनलाईन का असेना पण तुमच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमच्या घराचे भूमिपूजन करावे अशी इच्छा कीर्ती सुमंत रुईकर यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या