मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा फुले आदी महापुरुषांचा अवमान केल्यामुळे राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्रात खदखद होती. राज्यातील जनतेने चीड व्यक्त करत राज्यपालांचे पुतळे जाळले होते. ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलनेही होत होती. विरोधकांनी तर महामोर्चा काढून राज्यपालांविरोधातील संतापाला वाट मोकळी करून दिली होती. त्यामुळे राज्यपालांना अखेर पायउतार व्हावं लागलं आहे. ज्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यपालांना पायउतार व्हावं लागलं त्यावर टाकलेला हा प्रकाश…
राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात दीक्षांत समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. आमच्याकाळात नेहरु, गांधींजी आणि सुभाषचंद्र बोस चांगलेव वाटायचे. ते आमचे आवडते नेते होते.
पण आज तुमचा हिरो कोण असं विचारलं तर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्याकाळातील आहेत. आधुनिक काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते.
राज्यपालांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं होतं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांनी आपला पैसा काढून घेतला तर मुंबईचे काय होईल. मुंबईत पैसा शिल्लक राहील का? असा सवाल त्यांनी केला होता.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल त्यांची जीभ घसरली होती. लग्न झालं तेव्हा महात्मा फुले 12 वर्षाचे होते. सावित्रीबाई फुले 10 वर्षाच्या होत्या. लग्न झाल्यावर या वयातील मुले पुढे काय करतात? असं विधान त्यांनी केलं होतं. विकट हास्य करत राज्यपाल कोश्यारी यांनी हे विधान केलं होतं.
एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी थेट रामदास स्वामी यांनाच छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु संबोधले होते. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारणार? आणि समर्थ रामदास स्वामींशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल असं विधानही त्यांनी केलं होतं.
कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी पंडीत नेहरू यांच्यावर टीका केली होती. नेहरुंबद्दल मला आदर आहे. पण नेहरुंची एक कमजोर बाजू होती. त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमजोर झाला, अशी टीका राज्यपालांनी करून वाद ओढवून घेतला होता.