Mumbai Coastal Road | अटल सेतूनंतर मुंबईच्या दृष्टीने गेम चेंजर ठरणाऱ्या कोस्टल रोडच आज उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच लोकार्पण केलं. वरळी ते मरिन लाइन्स हा कोस्टल रोडचा 9.5 किलोमीटरचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरु होत आहे. उद्या म्हणजे मंगळवार सकाळपासून हा कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला होईल. छत्रपती संभाजी महाराज असं या कोस्टल रोडच नामकरण करण्यात आलं आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत मुंबई कोस्टल रोड वाहतुकीसाठी सुरु राहिलं. अजून 15 टक्के काम बाकी आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी आणि शनिवार-रविवारी उर्वरित काम केलं जाईल.
पहिल्या टप्प्यात 10.58 किलोमीटरचा मार्ग आहे. सोमवारी उद्घाटनानंतर त्यातला 9.5 किमीचा टप्पाच वाहतुकीसाठी खुला होईल. उर्वरित एक किमीचा टप्पा वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडला जाईल. मुंबईत उत्तर आणि दक्षिणेच्या दिशेने जास्त प्रवास होतो. सध्याच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पर्याय म्हणून मुंबईचा हा कोस्टल रोड बनवण्यात आला आहे. 13,983 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. हा कोस्टल रोड बनवताना ब्रिज बांधण्यात आले आहेत. समुद्राखाली बोगदा बनवण्यात आला आहे. मुंबईची वाहतूक कोंडी सोडवण हाच यामागे उद्देश आहे.
सध्या 30 मिनिट पण आता ब्रीच कँडी ते मरीन लाइन्स किती मिनिटात पोहोचणार?
सध्याच्या स्थितीत वरळी ते मरीन ड्राइव्ह हे अंतर कापायला 35 ते 40 मिनिट लागतात. कोस्टल रोडमुळे हा प्रवास 10 मिनिटात शक्य होणार आहे. या 10.58 किलोमीटरच्या मार्गाच वैशिष्ट्य म्हणजे 2.07 किमीचे दोन जुळे बोगदे बांधण्यात आले आहेत. या बोगद्याचा काही भाग समुद्राखाली आहे. हिंदू इस्लामिक जिमखाना येथून सुरु होणारा बोगदा गिरगाव चौपाटी, मलबार हिल येथून जातो. प्रियदर्शनी पार्क ब्रीच कँडीजवळ हा बोगदा संपतो. ब्रीच कँडी ते मरीन लाइन्सपर्यंत पोहोचण्यासाठी 3 मिनिट आणि काही सेकंद लागतील. एवढच अंतर कापायला सध्या सात सिग्नलसह 30 मिनिट लागतात. त्यामुळे प्रवासाचा बराच वेळ वाचणार आहे.
टोल किती लागणार?
कोस्टल रोडवर वाहनांसाठी सरासरी वेग मर्यादा 80 किमी प्रतितास आहे. पण तेच समुद्राखाली बोगद्यात वेग 60 किमी प्रतितास असेल. सध्या कोस्टल रोडचा वापर करताना टोल भरावा लागणार नाही. मोफत या मार्गावरुन प्रवास करता येईल.