मुंबई : औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. औरंगाबाद या शहराचे नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर” करण्याच्या प्रस्तावास गृह मंत्रालयने २४ फेब्रुवारी, २०२३ पत्रानुसार मंजुरी दिली आहे. पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, ” औरंगाबाद “, तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य या शहराचे नाव बदलून ते “ छत्रपती संभाजीनगर “, तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.
उस्मानाबाद” या शहराचे नाव बदलून ते “धाराशिव” असे करण्याच्या भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे पत्र ७ फेब्रुवारी, २०२३ अन्वये दिलेल्या मंजूर केले आहे. यामुळे “उस्मानाबाद” चे “धाराशिव ” झाले आहे.
कधीपासून होती मागणी
1988 पासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘ छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. औरंगजेबाच्या नावाला विरोध करून बाळासाहेब ठाकरेंनी ‘संभाजीनगर’ची घोषणा केली. परंतु तुम्हाला शहराचे नाव किती वेळा बदलले हे माहीत आहे का?
काय आहे इतिहास
औरंगाबाद शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे औरंगाबाद मानले जाते आहे.चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या महान हिंदू साम्राज्याचे सम्राट राजे कृष्णदेव राया यांच्या वंशजांचे यादवांचे राज्य होते.
काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहनगर ठेवले होते.