मुंबई : राज ठाकरे हे नाव महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार, फर्डे वक्ते, महत्त्वाचे नेते म्हणून राज ठाकरे लोकप्रिय आहेत. राज ठाकरे या पाच अक्षरी नावाचा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक दरारा आहे. पण राज ठाकरे यांचं खरं नाव वेगळच होतं हे तुम्हाला माहीत आहे काय? राज ठाकरे यांचं खरं नाव वेगळं होतं हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण ते खरं आहे. राज यांचं खरं नाव स्वरराज होतं. स्वरराज ठाकरे ते राज ठाकरे हा प्रवास कसा झाला? याचाही एक किस्सा आहे. खुद्द राज ठाकरे यांनीच हा किस्सा आज सांगितला.
व्हिजेटीआय कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाला आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या नावाचा किस्साही विद्यार्थ्यांना ऐकवला. तसेच जातीपातीच्या राजकारणात अडकू नका. छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालण्यापुरतं मर्यादित ठेवू नका. ज्या ज्या वयात जे जे करायचं ते करा. पण आपण मराठी आहोत. आपण हिंदू आहोत हे विसरू नका, असा सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
माझे वडील संगीतकार होते. माझ्या वडिलांकडे मोहम्मद रफी साहेबांनी जवळपास 14 गाणी मराठीत गायलेली आहेत. मी संगीतात काही तरी करावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी माझं पहिलं नाव स्वरराज असं ठेवलं. माझ्या आईचं नाव लग्नात मधुवंती ठेवलं. मधुवंती हा राग आहे. माझ्या बहिणीचं नाव जयजयवंती ठेवलं. जयजयवंती हा सुद्धा राग आहे. नंतर कालांतराने माझा राग त्यांना कळला. याला राग कुठे येतो, कुठे जमतो…, असं राज ठाकरे म्हणाले.
स्वरराज या नावानेच मी व्यंगचित्र करायचो. एके दिवशी बाळासाहेबांनी बोलावलं. म्हणाले माझं करीयरची सुरुवात बाळ ठाकरे या नावाने केली. आजपासून तू राज ठाकरे या नावाने करायची. तेव्हापासून राज ठाकरे झालं, असा किस्सा त्यांनी सांगितला.
कुठेही जा.. पण छत्रपती शिवाजी महाराज हा विषय फक्त हार घालण्यापुरता हा ठेवू नका. शिवाजी महाराज नीट समजून घ्या. मी शिवभक्त नाही. मी शिववेडा आहे. मी आव आणत नाही. त्यातून बोध घेतो. हार घालण्यापर्यंत मर्यादित ठेवत नाही. आपण कोण आहोत?मराठी आहोत. आपला वारसा काय आहे हे कळलं पाहिजे. आपल्या लोकांनी काय केलं हे समजलं पाहिजे, असं त्यांनी सांगितंल.
औरंगजेब बादशाह मोठा होता. पूर्वी हिंद प्रांत होता. त्यावर औरंगजेबाचं साम्राज्य होतं. तीन ते चार जिल्हे फक्त शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. शिवाजी महाराजांना मारायला तो आला होता. चार जिल्ह्याचा राजा. काय फरक पडला असता औरंगजेबाला. शिवाजी महाराज गेल्यानंतरही औरंगजेब महाराष्ट्रात आला. 27 वर्ष महाराष्ट्रात राहिला आणि मेला.
मी स्वत: पाहिलेलं नाही. ऐकलेलं आहे. 27 वर्षात औरंगजेबाने जी काही पत्र लिहिली आग्र्याला. त्यात एक वाक्य आहे. शिवाजी मला अजूनही छळतोय. शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी राजे ते ताराराणी हे लढत होते. या प्रेरणेला तो शिवाजी महाराज म्हणत होता. महाराज नसतानाही तो 27 वर्ष महाराष्ट्रात होता. त्यांना शिवाजी महाराजांचा विचार मारायचा होता. पण ते मेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.