मुंबई: मतदार याद्यांमधील डबल डबल नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने (election commission) महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. येत्या 1 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे मतदार यादीतील (voters) डबल झालेली नावे वगळता येणार आहेत. शिवाय बोगस मतदानाला आळाही बसणार आहे. मतदान करताना मतदारांना आधार कार्ड (aadhar card) किंवा निवडणूक आयोगाने सांगितलेल्या 11 पैकी कोणताही एक दस्ताऐवज घेऊन जावं लागणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचा हक्क बजावता येणार आहे. मात्र, आधार कार्ड मतदान कार्डाशी संलग्न झाल्यावर मतदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे. या गोपनीयतेचा भंग झाल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज याबाबतची माहिती दिली.