अतुल कांबळे,TV9 मराठी, मुंबई : कोकणातील चाकरमान्यांसाठी खुशखवर आहे. सीएसएमटीहून सुटणाऱ्या तेजस एक्सप्रेसचा आता मडगावपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. ही ट्रेन सकाळी 5.50 वा.सीएसएमटीहून सुटून 8 तास 50 मिनिटात मडगाव गाठणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांसह गोव्याला पर्यटनाला जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.
गोव्याला जाताना पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी तेजस एक्सप्रेसला ऑगस्ट 2020 पासून विस्टाडोम कोच बसविला आहे. ही ट्रेन त्यावेळी करमाळीपर्यंत धावायची. आता तिचा विस्तार मडगावपर्यंत केल्यामुळे गोव्याला जाणार्या प्रवाशांना पारदर्शक छताच्या डब्यांतून कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.
तेजस ट्रेन आठवड्यातून मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी पाच वेळा चालविण्यात येते. ही ट्रेन सीएसएमटी स्थानकातून सकाळी 5.50 वा. सुटून दुपारी 3.15 वा. मडगावला पोहचेल. मडगावहून परतीची गाडी दुपारी 3.15 वा. सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.55 वा. सीएसएमटीला पोहचेल असे कोकण रेल्वेने म्हटले आहे.
विस्टाडोम कोचमध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधांची रेलचेल आहे. मोठ्या आयताकार खिडक्या आहेत. तसेच एलईडी लाइट, रोटेटेबल सीट आणि पुश बॅक चेअर, टेलिव्हीजन स्क्रीन, विद्युत संचालित स्वयंचलित स्लायडींग कम्पार्टमेंट दरवाजे, दिव्यांगासाठी अधिक रूंद साइड स्लायडींग दरवाजे, पारदर्शक छत तसेच निसर्ग पाहण्यासाठी स्वतंत्र व्हीविंग गॅलरी अशा सुविधा आहेत.