Kurla Bus Accident: 25 जणांना चिरडणाऱ्या बसमधील थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर

| Updated on: Dec 11, 2024 | 7:44 PM

मुंबईतील कुर्ला बस अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. फुटेजमध्ये बसचा वेग आणि घाबरलेल्या प्रवाशांची अवस्था स्पष्ट दिसत आहे. अपघातात 7 जणांचा मृत्यू आणि 45 जण जखमी झाले आहेत. बसचालक संजय मोरे याला अटक करण्यात आली असून कोर्टाने त्याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Kurla Bus Accident: 25 जणांना चिरडणाऱ्या बसमधील थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर
25 जणांना चिरडणाऱ्या बसमधील थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर
Follow us on

कुर्ला बस अपघात प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. या अपघातावेळी अपघातग्रस्त बसमध्ये नेमकी काय परिस्थिती होती ते दर्शवणारे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. बस अपघात घडला त्यावेळी बसमध्ये नेमकं काय-काय घडत होतं? हे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट बघायला मिळत आहे. बसचालक इतक्या वेगाने गाडी चालवत होता ते पाहिल्यानंतर बसमधील प्रवाशांचीदेखील भंबेरी उडाली होती. प्रवासी एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते. ते प्रचंड गोंधळलेले होते. नेमकं काय सुरु आहे, हे सुरुवातीला कदाचित त्यांना कळत नसावं. पण बसने अनेक गाड्यांना धडक दिल्यानंतर प्रकरण काहीतरी गंभीर असल्याचं प्रवाशांना जाणवत असल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी धडपत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघायला मिळत आहे. यावेळी गाडीच्या अनिश्चित वेगामुळे प्रवासी देखील खाली पडताना दिसतात. विशेष म्हणजे बसमध्ये वृद्ध व्यक्तीदेखील होते. ते देखील या अपघातात दुखापतग्रस्त झाल्याची शक्यता आहे. कारण बसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तशा गोष्टी घडताना बघायला मिळत आहेत.

मुंबईच्या कुर्ला पश्चिमेत सोमवारी (9 डिसेंबर) बेस्ट बस अपघाताची भीषण घटना घडली होती. या अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच 45 जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईतील भाभा रुग्णालय, सायन रुग्णालय आणि आणखी इतर काही रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती आहे. या घटेनमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. मुंबईत लोकल ट्रेनला जसं लाईफलाईन मानलं जातं, तसंच बेस्ट बस ही देखील मुंबईकऱ्यांच्या वाहतुकीचा आत्मा आहे. पण बेस्ट बसचा इतक्या भीषण पद्धतीने अपघात झाल्याने मुंबईकरदेखील चिंतेत पडले आहेत.

बसचालकावर काय कारवाई?

या प्रकरणी पोलिसांनी बसचालक संजय मोरे याला अटक केली आहे. बसची तपासणी केली असता बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता, असं स्पष्ट झालं आहे. बसचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही अपघाताची घटना घडल्याचं स्पष्ट झालं आहे. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांकडून मोठा रोष व्यक्त करण्यात आला होता. इतकी भयानक अनेकांच्या डोळ्यांदेखल घडल्यामुळे अनेक जण संतप्त झाले होते.

हे सुद्धा वाचा

या घटनेत बसने अनेक वाहनांना धडक दिली होती. यामध्ये बस, कार, टेम्पो, चारचाकी मालवाहतूक वाहनं यांचा समावेश होता. या पलिकडे जावून बसने अनेक माणसांना चिरडलं देखील होते. त्यामुळे या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. ही घटनादेखील तितकी सुन्न करणारी होती. घटनेनंतर परिसरात तातडीने पोलीस, मुंबई महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापक विभागाचं पथक, रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. जखमींना तातडीने रुग्णालयात रवाना करण्यात आलं होतं. या घटनेतील आरोपी बसचालक संजय मोरे याला कोर्टाने 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पाहा बसमधील थरारक व्हिडीओ