Ladki Bahin Yojana: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी विधिमंडळात मांडला. या अहवालात राज्यात महायुतीची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली आहे. या योजनेत जून २०२४ पासून डिसेंबर २०२४ या सात महिन्यांत किती निधीचे वाटप झाले, त्याची माहिती अहवालात मांडण्यात आली आहे. त्यानुसार या सात महिन्यांच्या कालावधीत २ कोटी ३८ लाख लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा निधी देण्यात आला आहे. हा निधी तब्बल १७ हजार ५०५ कोटी रुपयांचा आहे, अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात आर्थिक पाहणी अहवाल मांडला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
जून ते डिसेंबर या सात महिन्यांत लाभार्थी महिलांना १५०० रुपये महिना देण्यात आला. आता महायुतीने घोषित केल्याप्रमाणे २१०० रुपये दर महिन्यात देण्याची तरतूद येत्या अर्थसंकल्पात मांडण्यात येणार का? ते आता सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना सुरु केली आहे. त्यात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात २ हजार ८८९ लाभार्थी होते. त्यांना ७ कोटी ७९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. परंतु सन २०२४-२५ मध्ये त्यात मोठी वाढ झाली. लाभार्थ्यांची संख्या एक लाख चार हजारावर पोहचली. त्यांनी ५२ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. माझी कन्या भाग्यश्री योजनेत सन २०२३-२४ मध्ये ६ कोटी ७८ लाखांचा निधी देण्यात आला. तो सन २०२४-२५ मध्ये १३ कोटी २० लाख झाला आहे.
महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी रहावी, महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रभावी धोरणे गावपातळीवर अंमलात यावीत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविल्या जाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.