मुंबई: आपल्या जादूई आवाजाने अनेक पिढ्यांवर गारूड निर्माण करणाऱ्या आणि आपलं संपूर्ण आयुष्य संगीत साधनेला अर्पण करणाऱ्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. तब्बल 28 दिवसांपासून सुरू असलेला जीवनमरणाचा संघर्ष थांबला. सूरमयी युगाचा अस्त झाला. आज संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्कात (shivaji park) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कात काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) हे सुद्धा मुंबईत शिवाजी पार्कवर येऊन लतादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, लतादीदींच्या निधनामुळे केंद्र सरकारने दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. तसेच संसद, मंत्रालय, सचिवालय, विधानसभांसह देशातील सर्व सरकारी कार्यालयावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार आहे.
लता मंगेशकर यांची प्राणज्योत आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी मालवली. गेल्या 28 दिवसांपासून त्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, काल त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. दुपारी 12.15 वाजता त्यांचे पार्थिव ब्रीच कँडितून परेड रोड येथील त्यांच्या प्रभू कुंज येथील निवासस्थानी दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर 6.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद मोदी आणि लतादीदींचं बहिण भावाचं नातं होतं. मोदी पंतप्रधान व्हावेत अशी जाहीर इच्छाही लतादीदींनी बोलून दाखवली होती. आज लतादीदींचं निधन झाल्याने मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दुपारी साडेचार वाजेपर्यंत मोदी मुंबईत येऊन लतादीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. लतादीदी यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
लता मंगेशकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क मैदानात तीन तास ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दल आणि भारतीय लष्कराकडून त्यांना शासकीय इंतमामात सलामी देण्यात येणार आहे. 20 पोलीस कर्मचारी, 5 अधिकारी, 2 बिगलुर असतील. यावेळी 3 राऊंड हवेत फायर केले जाणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कात जाऊन अंत्यसंस्काराच्या तयारीची पाहणी केली. तसेच पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडून सुरक्षेचा आढावा घेतला. लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय नेते, सेलिब्रिटी शिवाजी पार्कात येणार आहे. त्यावेळी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे.
संबंधित बातम्या:
Lata Mangeshkar Nidhan | दीदी गेल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा