70 मुलांकडून सलमानची रेकी, पाकिस्तानी शस्त्रे आणि… शूटर सुखाचा धक्कादायक खुलासा

| Updated on: Oct 17, 2024 | 9:14 PM

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पनवेल पोलिसांनी या प्रकरणी सुक्खा उर्फ सुखबीर बलबीर सिंह या प्रमुख शूटरला अटक केली आहे. सुक्खाने सलमान खानच्या घरावर हल्ला करण्याचा कट आखल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनेक सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

70 मुलांकडून सलमानची रेकी, पाकिस्तानी शस्त्रे आणि... शूटर सुखाचा धक्कादायक खुलासा
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानला गुंड लॉरेन्स बिश्नोई याने अनेकदा धमकी दिली आहे. तसेच लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याची देखील घटना घडली आहे. त्यामुळे सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्म हाऊसबाहेरही बिश्नोई गँगकडून रेकी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पनवेल पोलिसांनी हरियाणाच्या पाणीपत येथे जावून बिश्नोई गँगचा शूटर सुक्खा उर्फ सुखबीर बलबीर सिंह याला अटक केली आहे. सुक्खा यानेच सलमान खानच्य घरावर गोळीबार करण्याचा कट आखला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

आरोपी सुक्खा याला पोलिसांनी पनवेलला आणलं. त्याची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी सुक्खाच्या चौकशीत त्याने सलमानच्या घरावर हल्ला करण्याचा कट कसा आखला? याबाबत सविस्तर कबुली दिली. आपण लॉरेन्स बिश्नोई गँगचा सक्रिय सदस्य असल्याची कबुली त्याने दिली. तसेच त्यानेच बिश्नोई गँगच्या इतर सदस्यांना सलमान खानला जीवे मारण्याची सुपारी दिली होती. तसेच शूटर्सना चांगल्या पिस्तूल पुरवण्यासाठी त्याने पाकिस्तानात बसलेल्या त्याच्या गँगच्या एका कुख्यात गुंडाशी संपर्क केला होता, असं त्याने कबूल केलं.

सुक्खाला पाकिस्तानातून शस्त्रांची खेप

सुक्खाला त्याच्या पाकिस्तानातील सहकाऱ्याकडून AK-47, M-16 आणि AK-92 सारख्या शस्त्रांची खेप पाठवली होती. त्यानंतर लॉरेन्स गँगच्या 70 शूटर्सला सलमान खानच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं. विशेष म्हणजे या कटात संपत नेहरा टोळीदेखील सहभागी होती. या दोन्ही गँगमधील सदस्यांनी सलमान खानचे वांद्रे येथील निवासस्थान, पनवेलमधील फार्महाऊस आणि त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगची ठिकाणे रेकी करण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान एप्रिल महिन्यात सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटवर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटर्सनी गोळीबार केला होता. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

पोलिसांकडून 5 आरोपींना अटक

पनवेल पोलिसांनी 24 एप्रिलला सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या 18 जणांसह इतरांवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई, त्याचा भाऊ अनमोल, संपत नेहरा, गोल्डी बराड, रोहित गोधारा यांच्या नावांचा समावेश होता. पनवेल पोलिसांनी तपासादरम्यान लॉरेन्स बिश्नोई गँगचे धनंजय उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया, वासपी खान उर्फ वसीम चिकना, रिजवान खान उर्फ जावेद और दीपक हवा सिंह उर्फ जॉन या आरोपींना अटक केली होती.

बिश्नोई गँगमध्ये अल्पवयीन शूटर

विशेष म्हणजे नवी मुंबई पोलिसांनी याच वर्षी जून महिन्यात महत्त्वपूर्ण खुलासा केला होता. आरोपींकडून सलमान खानला त्याच्या पनवेल फॉर्म हाऊसला जाताना निशाणा केलं जाऊ शकतं. तसेच लॉरेन्श बिश्नोई गँगमध्ये अल्पवयीन शूटरदेखील असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. ते पाकिस्तानातून आणलेल्या शस्त्रांच्या माध्यमातून सलमानवर हल्ला करु शकतात. तर दुसरीकडे आपल्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर सलमानने लॉरेन्स बिश्नोई गँगने आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना मारण्याच्या हेतूने गोळीबार केला होता, असा दावा केला होता.