मुंबई : कोरोनाकाळात (Corona) अनेक ठिकाणी बदल करण्यात आले. अनेक ठिकाणच्या वेळा बदलल्या. कोरोना निर्बंधात जाता येत नसल्याने परिवहन विभागाने ऑनलाइन शिकाऊ चालक परवाना (Learning Driving Licenses) देण्यासही सुरूवात केली होती. हा परवाना देताना दहावीच्या परीक्षेत (Tests) जसे डमी उमेदवार बसतात तशाच प्रकारे शिकाऊ वाहन चालकांच्या या परीक्षेत देखील गडबड होऊ लागल्याचं लक्षात आलं. त्यामुळे परिवहन विभागाने आता आर्टीफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून या फेसलेस तंत्राचे उद्घाटन आज गुरुवारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे डमी उमेदवार बसविणं आता अशक्य होणार एवढं मात्र नक्की.
कोरोना लाटेत नागरिकांवर बंधने असल्याने त्यांना सोयीचे व्हावे म्हणून एप्रिल 2021 पासून शिकाऊ वाहन परवान्यासाठी घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देण्याची प्रक्रिया आरटीओने सुरू केली. दलालांनी त्यावर कडी करीत स्वत:च चाचणी देऊन उमेदवारांना परीक्षेतून सूट दिली. त्यामुळे कोणलाही लायसन्स मिळू लागलं. शिकाऊ वाहन परवाना घरबसल्या मिळवा, अशा दलालांच्या जाहिरातीही निघाल्याने चिंता वाढली होती. चाचणी न देता लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स अगदी व्हॉट्सअॅपवर मिळू लागल्याने राज्यभरातून परिवहन विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
शिकाऊ वाहन परवाना हा उमेदवाराला वाहन चालविणं शिकवण्यासाठी मिळालेला असतो. त्यामुळे तो केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असतो. त्यानंतर पक्के लायसन्स बनवावे लागते. शिकाऊ व्यक्ती गाडी चालवत असताना त्याच्या शेजारी पक्के ड्रायव्हिंग लायसन्स असलेली व्यक्ती बसणं गरजेचं आहे. असं कोणालाही शिकाऊ लायसन्स मिळाल्याने चुकीच्या हाती स्टेअरिंग गेल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले होते.
संगणकाचा वेब कॅमेरा ऑन झाल्यावर उमेदवाराला हळूच बाजूला करीत दलाल लोकच स्वत: चाचणी द्यायचे. मात्र, आता स्क्रिनवर जरा जरी हालचाल झाली तरी चाचणीची ऑनलाइन संगणकीय प्रक्रिया आपोआप बंद होईल. तसेच आधार कार्डवरील उमेदवाराच्या फोटोला ओळखूनच चाचणी सुरू होईल. त्यामुळे डमी उमेदवार चाचणीला बसण्याची शक्यता नष्ट होईल. त्यासाठी सारथी सॉफ्टवेअरमध्ये बदल केले आहेत. गुरुवारी आज प्रणाली लागू होईल, असं सूत्रांनी सांगितलं.
फेसलेस तंत्राचे उद्घाटन आज गुरुवारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे डमी उमेदवार बसविणं आता अशक्य होणार एवढं मात्र नक्की. यामुळे चुकीच्या गोष्टीला आळा बसेल.