मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारने अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताच देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देताना भाजपला कानपिचक्याही दिल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणीजी ह्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला ह्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. केंद्र सरकारचं देखील अभिनंदन, अर्थात गेली 10 वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना, ज्यांच्यामुळे भाजप आज ज्या स्थानावर आहे, त्या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान ह्या आधीच मिळायला हवा होता. अर्थात हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. असो, अशा कानपिचक्या राज ठाकरे यांनी भाजपला दिल्या आहेत.
करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच, आणि हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली. राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली. रथयात्रेतून अडवाणीजींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना ‘अब की बारी अटलबिहारी’ म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणीजींकडे होता, असंही राज यांनी म्हटलं आहे. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंतच राजकारण पाहिलेले आणि देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या ह्या ज्येष्ठ नेत्याचं ह्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन, असं राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणीजी ह्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला ह्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. केंद्र सरकारचं देखील अभिनंदन, अर्थात गेली १० वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना,… pic.twitter.com/DfV7QWuLtt
— Raj Thackeray (@RajThackeray) February 3, 2024
भारताचे माजी उप- पंतप्रधान व ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचे आनंद आहे. देशाच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे, मनःपूर्वक अभिनंदन, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.
कर्पूरी ठाकूर आणि अडवाणी ही दोन्ही नावे भारतरत्न पुरस्कारासाठी योग्यच आहेत. ठाकूर यांनीही देशासाठी आपलं योगदान दिलं. मी मुख्यमंत्री असताना ठाकूर हे बिहारचे मुख्यमंत्री होते. साधे आणि विनम्र व्यक्ती होते. त्यांची निवड योग्य आहे. अडवाणी देशाच्या संसदेत अनेक वर्ष होते. एखाद दुसरा सोडला तर त्यांचा पराभव झाला नाही. रथ यात्रा काढल्या नंतर काही घटना घडल्या. मात्र त्यांचं जीवन हे आदर्श असं आहे. त्यांची निवड होण्याला उशीर झाला. मात्र मी त्यांचं अभिनंदन करतो, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
प्रखर राष्ट्रभक्त अशा ज्येष्ठ नेते अडवाणी जी यांनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारण यासाठी समर्पित केले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर व्हावे हे त्यांचे स्वप्न देखील साकार झाले आहे. या मंदिरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, रथयात्रेचे नेतृत्व या गोष्टी त्यांच्या प्रभावी नेतृत्वशैलीचे उदाहरण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे आणि सर्वसमावेशक असे त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आणि आदरणीय आहे. उत्तम संसदपटू आणि परखड विचारांचे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होणे अत्यंत आनंददायी बाब आहे. त्यांना उत्तम आयुरारोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, असे अभिष्टचिंतन करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कारासाठी अभिनंदन केले आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अडवणी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. अडवाणी हे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. आम्ही त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलोय. अतिशय सुसंकृत नेते म्हणून पाहत असताना त्यांना भारतरत्न मिळाला आहे. मला सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि वाजपेयी यांची आठवण येते. आज ते पाहिजे होते. आज अडवाणी यांना भारतरत्न मिळाला याबद्दल हार्दिक अभिनंदन करते. अडवाणी यांचे कौतुक उशिरा का होईना होतंय. आधीच हा पुरस्कार दिला असता तर आम्हाला निश्चितच आनंद झाला असता, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.