बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना स्थानिक लोकांनी पकडलं

| Updated on: Oct 12, 2024 | 11:12 PM

शनिवारी संध्याकाळी मुंबईतील वांद्रे पूर्व येथे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. एक गोळी छातीला लागल्याने त्यांचा मृत्यू झालाय. त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार झाल्याची माहिती आहे.

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना स्थानिक लोकांनी पकडलं
Follow us on

बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार होताच गोळीबार करणाऱ्या दोघांना स्थानिक लोकांनी पकडलं. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. देवीच्या विसर्जन मिरवणुकीत फटाक्यांच्या आवाजाच्या दरम्यान हा गोळीबार झाला. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणारे दोघेजण निर्मलनगर पोलिसांच्या ताब्यात आहेत. गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरु झाला आहे. बाबा सिद्दिकी यांची काही दिवसापूर्वीच सुरक्षा वाढवण्यात आली होती. बाबा सिद्दिकी यांच्या जिवाला धोका असल्याचं लक्षात घेता ही सुरक्षा वाढवण्यात आली होती.

चार गोळ्या झाडल्याची माहिती

बाबा सिद्दिका यांच्यावरील हल्ल्याबाबत पोलिसांकडून अद्याप काहीही बोलण्यास नकार देण्यात आला आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.  पोलिसांना घटनास्थळी चार बुलेट शेल सापडल्या आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक लोकांनी त्यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. आरोपींमध्ये एक जण हरियाणाचा तर एक जण यूपीचा असल्याची माहिती पुढे येत आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. व्रांद्रेचे आमदार आशिष शेलार देखील रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमू लागले आहेत. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

सिद्दिकी यांचा एक सहकारी ही जखमी

बाबा सिद्दिकी यांच्यावरील गोळीबारानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाबा सिद्दिकी यांच्या छातीला एक गोळी लागल्याची माहिती आहे. उपचाराच्या आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. बाबा सिद्दिकी यांच्या एका सहकार्याच्या पायाला देखील गोळी लागल्याचं बोललं जात आहे.

बाबा सिद्दिकी हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. या शिवाय ते राज्यमंत्री देखील होते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. ते दरवर्षी रमजानमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करायचे. अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटी त्यांच्या या इफ्तार पार्टीला हजेरी लावायचे.