शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांच्याकडे पुत्र म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवर अधिकार आहे. परंतु शिवसेना उबाठा आता फक्त मुस्लिमाचे लांगूलचालन करत आहेत. आता भाषणाच्या सुरुवातीला “माझ्या तमाम हिंदू-बंधू बांधवांनो” हे शब्द ते बोलत नाहीत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी उद्धव ठाकरे यांच्या प्रचारात सहभागी होत आहे. सध्या उद्धव ठाकरे फक्त मतांचा विचार करत आहेत. परंतु ज्या शक्तीशी बाळासाहेब लढले, त्या शक्तींनाच उद्धव ठाकरे मदत करत आहेत. यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे ते अधिकारी नाही. ते अधिकार फक्त एकनाथ शिंदे यांना आहे, असा घणाघाती हल्ला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी ‘टीव्ही ९ मराठी’चे संपादक उमेश कुमावत यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मोकळेपणे उत्तरे दिलीत. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यावर घाणाघाती हल्ले केले. अगदी उद्धव ठाकरे आता मुस्लिमांचे लांगूलचालन करत असल्याचा आरोप केला.
मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी व्यक्ती केवळ मराठी नाही तर हिंदू आहे. तसेच फक्त हिंदू नाही तर कट्टर हिंदू देखील आहेत. या हिंदू व्यक्तींना पहिल्यांदा शिवसेना उबाठाच्या रॅलीमध्ये पाकिस्ताचे झेंडे दिसून आले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या सुरुवातीला आधी हिंदू शब्द येत होता. आता तो शब्द सोडला. का तुम्हाला हिंदू शब्द घेण्याची आता लाज वाटते का? कारण तुम्हाला त्यांच्या भरवश्यावर निवडणूक लढवायची आहे. यामुळे शिवसेना उबाठा आता लांगूलचालन करत असल्याचे मराठी व्यक्तींना स्पष्ट दिसत आहे. एखादी निवडणूक हारली तरी चालेल पण बाळासाहेबांनी हे लांगूलचालन सहन केले नसते. त्यापेक्षा त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली असती.
मुस्लीम मतदार दुसरीकडे जाण्यास भाजप जबाबदार नाही का? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसने देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा असल्याचे म्हटले आहे. परंतु आमचे म्हणणे आहे, पहिला हक्क गरीबांचा आहे. मोदीजींना मुस्लिम समाजाला घरे दिली नाही का? त्यांना गॅस दिला नाही का? त्यांना सरकारी योजनेचा लाभ दिला नाही का? मुस्लीम देशाचे नागरिक आहेत. त्यांचाही विकास झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन मोदी सरकारने काम केले आहे. यामुळे २० कोटी मुस्लीम मतदारांना मोदी यांच्या योजनेचा फायदा आहे.
आरक्षण देताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास विरोध केला होता. परंतु आता काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण दिले. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. त्यानंतर एका रात्रीतून जीआर काढून मुस्लिमांना ओबीसीचे आरक्षण दिले.