मुंबईतील 37 मशिदीमधून शिवसेना ठाकरे गटाला मतदान करण्याचे फतवे निघाले आहेत. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊ न देण्यासाठी हे फतवे काढले आहेत. यानंतर शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी हा प्रकार आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले असून निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत समाजात द्वेष पसरवण्याचे हे कार्य असल्याचे म्हटले आहे. शिंदे गटाचे प्रवक्त किरण पावसकर यांनी या प्रकरणात फतव्याची प्रत देऊन मुंबईतील जे.जे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी फतवे काढण्याचा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे. हा प्रकार म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. या फतव्याची प्रत पोलिसांकडे देऊन कारवाई झाली नाही. हे प्रकरण पोलिसांकडून गांभीर्याने हाताळले जात नाही. या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्याने दिरंगाई केली असेल त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केसरकर यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे आम्ही मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.
दीपक केसरकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बंदी घातल्यासंदर्भातील आठवण सांगितली. विले पार्लेमध्ये बाळासाहेबांनी एकदा धार्मिक शब्द उच्चारला होता. तेव्हा त्यांना 6 वर्ष बंदी घातली होती. पंरतु आता कारवाई होत नाही. ही लोकशाहीची हत्या आहे, असे फतवे निघत असतील तर निवडणुकीला काय अर्थ आहे? लोकशाही मध्ये धर्माच्या नावाने प्रचार सुद्धा करता येत नाही. आता या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, असे केसरकर यांनी म्हटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील मशिदीतून प्रथमच फतवे निघाले आहे. हे काम कोणत्याही धार्मिक लोकांनी करु नये. परंतु काही लोक जाती जातीमध्ये विष कालवण्याचे काम करत आहेत. आम्ही विकासाच्या मुद्यावर जात आहोत. यामुळे आता चार तारखेला खूप विकेट पडलेला दिसणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.