मुंबई | 2 मार्च 2024 : महाराष्ट्र आणि देशात लोकसभा निवडणुकीचं बिगूल आता कधीही वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी देशातील उमेदवारांची पहिली यादीदेखील जाहीर केली आहे. या यादीत 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही दिग्गजांना या यादीतून वगळण्यात आलं आहे. भाजप सारखंच महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपासाठी सातत्याने बैठकांचं सत्र पार पडलं. या बैठकांमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या 42 जागांचं वाटप झालं असून उमेदवारही निश्चित झाले आहेत. तर 6 जागांवर तिढा कायम आहे. हा तिढा लवकरच सोडवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यासाठी बऱ्यात हालचालीदेखील मविआत घडत आहे.
महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करणारी बैठक, 5 किंवा 6 तारखेला होणार आहे. पण 42 जागांवर मविआतल्या तिन्ही पक्षात एकमत झालं आहे. उमेदवारही ठरल्याची माहिती TV9ला मिळालीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याची जागा वंचितसाठी सोडली जाणार तर हातकणंगलेची जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली जाणार आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पुन्हा इशारा देत आम्ही स्वतंत्र लढल्यास 6 जागा जिंकू शकतो असं म्हटलं आहे. वंचितनं 27 जागांची मागणी केलीय. त्यामुळे 1-2 जागांवर समाधान होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर सूचवू पाहत आहेत. अर्थात 5 किंवा 6 तारखेच्या बैठकीत सर्व स्पष्ट होईल.
शिवसेना ठाकरे गटाची यादी