निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीची मालकी दिल्यानंतर अजितदादांनी राष्ट्रवादीच्या वाढीचा संकल्प घेतला. नव्या उमेदीची ग्वाही देत ‘चिन्ह तेच वेळ नवी’ या नाऱ्यानं अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीची वाटचाल सुरु झाली. मात्र महायुतीच्या जागावाटपात पुणे वगळता पश्चिम महाराष्ट्रातून घड्याळच हद्दपार झालंय. याआधी साताऱ्यातून राष्ट्रवादी लढत होती. तिथं भाजपनं उमेदवार दिलाय. इकडे मविआत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं साताऱ्यात शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिलीय. माढ्याची जागा राष्ट्रवादीकडे होती, विद्यमान खासदारामुळे ती जागाही भाजपकडे गेली. इकडे धैर्यशील मोहितेंना शरद पवार गटानं तिकीट दिलंय.
अहमदनगरमधूनही राष्ट्रवादी लढत होती. विद्यमान खासदारामुळे ती जागा भाजपला गेली. इकडे शरद पवारांनी निलेश लंकेंनी तिथून तिकीट दिलंय. कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे होती. विद्यमान खासदारामुळे ती शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली. याबाजूला काँग्रेसकडून शाहू महाराजांना उमेदवारी मिळालीय. मावळमधून राष्ट्रवादी लढत होती. यंदा तिकडे शिंदेंची शिवसेना लढतेय. तर शरद पवारांच्या गटानंही ती जागा ठाकरेंच्या उमेदवारासाठी सोडली.
चिन्ह आणि पक्षाच्या वादात राष्ट्रवादीचे दोन गट झाले. मात्र प्रत्यक्षात घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना फक्त बारामती आणि शिरुर या दोनच लोकसभांमध्ये होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. कोल्हापूर आणि साताऱ्यात पक्षस्थापनेची बीजं रोवली गेली. चिन्हंही याच जिल्ह्यात निश्चित झालं. मात्र तेच घड्याळ यंदा या दोन्ही जिल्ह्यातून गायब झालंय. स्थापनावर्ष म्हणजे 1999, 2004 आणि 2014 या तिन्ही वेळेस कोल्हापुरात राष्ट्रवादीचे खासदार होते. साताऱ्यात 1999, 2004, 2014, 2019 सार्वत्रिक निवडणूक, 2019 ची पोटनिवडणूक या पाचही वेळा राष्ट्रवादीचे खासदार जिंकले. यंदा शरद पवारांच्या गटाच्या तुतारी चिन्हावर उमेदवार असले, तरी अजित पवारांच्या घड्याळ या चिन्हावर उमेदवार नसतील.
माढ्यात 2009 ला शरद पवार, 2014 विजयसिंह मोहिते पाटील खासदार राहिले. यंदा शरद पवारांच्या गटाच्या तुतारी चिन्हावर उमेदवार आहेत, मात्र घड्याळाऐवजी युतीकडून भाजपचे उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादी स्थापनेपासून ते पक्ष फुटीपर्यंत सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, माढा या पाच जागा सातत्यानं लढवत आली होती. मात्र फुटीनंतर या भागात घड्याळ चिन्हावर एकही उमेदवार नाहीय. तर शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर 2 उमेदवार आहेत.