लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वाधिक रंगतदार लढत बारामती आणि कल्याण लोकसभा मतदार संघात होत आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होणार आहे. परंतु कल्याणमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत आहे. त्यातच ‘बिग बॉस’ अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे लढत अधिकच रंगतदार होणार आहे. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या उमदेवारी अर्जासोबत संपत्तीचे विवरण जोडले आहे. त्यानुसार पाच वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल १३ कोटी रुपयांनी वाढली आहे.
पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये श्रीकांत शिंदे मालमत्ता १ कोटी ६७ लाख ५९ हजार ५१५ इतकी होती. परंतु आता १४ कोटी ४३ लाख ८० हजार ७९० रुपयांची मालमत्ता त्यांची झाली आहे. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नावाने सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या गावात शेतजमीन आहे. तर त्यांची पत्नी वृषाली शिंदे यांच्या नावे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमीन आहे. वृषाली शिंदे या कुडाळ तालुक्यात असलेल्या हुमरमाळा गावातील शेतकरी आहेत. तसेच वृषाली शिंदे यांच्या नावाने ठाण्यातील पाचपाखाडी येथे देव अशोका, कळवा येथे इंद्रायणी को-ऑप. सोसायटी आणि ठाण्यातील रहेजा गार्डन येथे अॅस्कोना अमाल्फी येथे सदनिका आहे.
श्रीकांत शिंदे यांच्याकडे स्वत:चे एकही वाहन नाही. निवडणूक घोषणापत्रात त्यांनी एकही वाहन नसल्याची माहिती दिली आहे. परंतु त्यांच्याकडे दागिने आहेत. श्रीकांत शिंदे यांच्याकडे ११ लाख ३४ हजार ५२९ रुपयांचे सोने आहे. ४ लाख ९७ हजार १३७ रुपयांची हिऱ्याची अंगठी त्यांच्याकडे आहे. १ लाख १० हजार ५०० रुपयांचे दोन घडयाळे त्यांच्याकडे आहे. त्यांची पत्नी वृषाली शिंदे यांच्याकडे दागिने आहेत. २२ लाख ८२ हजार ७२५ रुपयांचे सोने वृषाली शिंदे यांच्याकडे आहे. ७ लाख ५६ हजार रुपयांची हिऱ्याची अंगठी आणि १ लाख ६३ हजार ८७२ रुपयांचे चांदीचे दागिने वृषाली शिंदे यांच्याकडे आहे. तसेच ३ लाख ४४ हजार १७ रुपयांचे दोन घडयाळे आहेत.
श्रीकांत शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर कर्ज आहे. श्रीकांत शिंदे यांच्यावर १ कोटी ७७ लाख ३६ हजार ५५० तर वृषाली शिंदे यांच्यावर ४ कोटी ८५ लाख ८३ हजार ८९३ रुपये कर्ज आहे.