उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर उज्वल निकम आणि आशिष शेलारांच्या नावाची चर्चा सुरु आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्षा गायकवाडांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत मुंबईतील सहाही जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केलाय. उत्तर मुंबईची जागा सोडल्यास मुंबईतील मविआचे उमेदवार निश्चित झाले आहेत. मुंबईत ठाकरे गटाकडून मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर आणि मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दीना पाटलांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आलीय. तर काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर उत्तर मुंबईमधून काँग्रेसनं आपला उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही.
दरम्यान महायुतीच्या मुंबईतील 6 जागांपैकी 2 जागावर भाजपनं आणि 1 जागेवर शिवसेनेनं आपला उमेदवार दिलाय. मुंबई उत्तरमधून भाजपकडून पियूष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र, मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा आहे. मुंबई दक्षिणमधून यशवंत जाधव आणि उत्तर मध्य मुंबईमधून उज्वल निकम आशिष शेलारांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचं आव्हान असणार आहे. तर मुंबई उत्तर पूर्वमध्ये भाजप विरूद्ध ठाकरे गटाची लढाई असणार आहे. भाजपच्या मिहीर कोटेंचासमोर ठाकरे गटाचे संजय दीना पाटील मैदानात आहेत. तर उत्तर मुंबईतून भाजपचे पीयूष गोयलांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून अद्याप कोणताही उमेदवार देण्यात आलेला नाही. उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर मैदानात आहेत. तर त्यांच्याविरोधात शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांची चर्चा आहे. तर दक्षिण मुंबईमधून ठाकरे गटाचे अरविंद सावंत मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या यशवंत जाधवांच्या नावाची चर्चा आहे. उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसकडून वर्षा गायवाड लढणार आहेत. दरम्यान त्यांच्याविरोधात उज्वल निकम आणि आशिष शेलारांच्या नावाची चर्चा आहे.
2019 मध्ये उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या पूनम महाजनांसमोर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचं आव्हान होतं. पूनम महाजन यांना 4 लाख 86 हजार 472 तर प्रिया दत्त यांना 3 लाख 56 हजार 667 मतं मिळाली होती. 1 लाख 30 हजार मतांच्या फरकानं पूनम महाजन विजयी झाल्या होत्या. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघावर ठाकरे गटाची चांगली पकड आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा वर्षा गायकवाडांना चांगलाच फायदा होणार आहे. उद्धव ठाकरेंनीही वर्षा गायकवाड यांना खासदार करुन दिल्लीत पाठवणार असल्याचा शब्द दिलाय.
उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलंय. उत्तर मध्य मुंबईमधून समोरासमोर लढण्याचं आव्हान त्यांनी ठाकरेंना दिलंय. मविआकडून उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलीय. मात्र, महायुतीकडून अद्याप कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी आशिष शेलार आणि उज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरु आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना कोण आव्हान देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.