अमित शाह, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत काय झाले?… देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच केला गौप्यस्फोट

| Updated on: May 17, 2024 | 1:39 PM

devendra fadnavis special interview on tv9 marathi: आता उद्धव ठाकरे शपथ घेऊन खोटे बोलत आहे. अगदी बाळासाहेब आणि भावानी मातेची ते शपथ घेत आहे. यामुळे ते भ्रमिष्ट झाले असणार, असे मला वाटत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

अमित शाह, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत काय झाले?... देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच केला गौप्यस्फोट
राज्यात चर्चेत राहिलेली मातोश्रीवरील बैठकीनंतर झालेली पत्रकार परिषद
Follow us on

राज्याचे राजकारण भाजप-शिवसेना यांच्यातील मातोश्रीवर झालेल्या बैठकीवर वारंवार येत आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते, असा दावा शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे वारंवार करत आहेत. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत हा निर्णय झाला होतो, असा दावा ते करतात. परंतु भाजपकडून हा दावा फेटाळला जात आहे. त्या बैठकीत नेमके काय झाले होते? अमित शाह यांनी स्पष्टपणे काय सांगितले होते? उद्धव ठाकरे बाळासाहेबांची आणि भावानी मातेची शपथ कशी घेत आहेत? या सर्व गोष्टींचा खुलासा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी त्या बैठकीतील ‘राज’ उघड केले. ‘टीव्ही ९ मराठी’चे संपादक उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली.

काय म्हणाले देवेद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर 18 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बैठकीची माहिती दिली. शिवसेना आणि भाजप दरम्यान चर्चा सुरु असताना शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी झाली. त्यावर आपण वरिष्ठांना विचारुन हा निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांना त्या प्राथमिक चर्चेत सांगितले. त्यानंतर रात्री एक वाजता भाजप नेते अमित शाह यांना फोन करुन हा विषय सांगितला. त्यांनी मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्ट नकार दिला. हवेतर जागा वाटपात आणि मंत्रीपदात तडजोड करता येईल, असे सांगितले. अमित शाह यांचा हा निरोप आपण उद्धव ठाकरे यांना सांगितला. मग चर्चा थांबली.

हे सुद्धा वाचा

पुन्हा सुरु झाली चर्चा

उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा मध्यस्थामार्फत चर्चा सुरु करण्याची मागणी केली. त्यावेळी चर्चेत त्यांनी विधान परिषदेतील जागा, मंत्रीपदे या मागण्या केल्या. तसेच अमित शाह यांनी मातोश्रीवर येऊन चर्चा करण्याची मागणी केली. मला त्यांच्याशी मनातील गोष्टी करायच्या आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मग अमित शाह यांना मी उद्धव ठाकरे यांचा संदेश दिला. अमित शाह मातोश्रीवर येण्यास तयार झाले. पण मुख्यमंत्रीपद देणार नाही, हे पुन्हा स्पष्ट करण्यास सांगितले.

बंद दाराआड झाली चर्चा

अखेर 18 फेब्रुवारी 2019 रोजी ती बैठक झाली. त्या बैठकीत मी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांना बंद दाराआड चर्चा करण्याचे सांगितले. त्या चर्चेनंतर अमित शाह यांनी मला बोलवले. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांना असे वाटू नये की मी यू-टर्न घेतला आहे. म्हणून तुम्हीच या पद्धतीने पत्रकार परिषदेत बोला. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत काय बोलावे, याचा सराव झाला. तो त्यांनी मान्य केला. शेवटी पत्रकार परिषदेत मीच बोललो. अमित शाह आणि उद्धव ठाकरे एक, एक वाक्यच बोलले.

आता उद्धव ठाकरे शपथ घेऊन खोटे बोलत आहे. अगदी बाळासाहेब आणि भावानी मातेची ते शपथ घेत आहे. यामुळे ते भ्रमिष्ट झाले असणार, असे मला वाटत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

हे ही वाचा

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी उद्धव ठाकरे यांच्या प्रचारात… देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आरोप