मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात

| Updated on: May 18, 2024 | 10:32 PM

भाजपचे उमेदवार मीहिर कोटेचा यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. कार्यालयाच्या बाहेर राडाही झाला. पोलिसांनी काही आंदोलक शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पोलिसांना इशारा दिलाय.

मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात
Follow us on

भाजपचे उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी रात्री राडा झाला होता. मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप होत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला. त्यानंतर तात्काळ स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यालयात आले. तर पोलिसांनी कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर घोषणा देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. त्यावरुन आता उद्धव ठाकरे यांनी थेट पोलिसांनाच इशारा दिलाय.

दोन्ही बाजुचे कार्यकर्ते भिडले

शुक्रवारी रात्री दादरच्या शिवाजी पार्कात एकीकडे पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सभा जेमतेम संपली होती. त्याचवेळी मुलुंडमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी भाजपचे उमेदवार मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैशांचा खेळ सुरु असल्याचा आरोप केला. ठाकरेंचे शिवसैनिक कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर जमल्यानंतर, भाजपचेही कार्यकर्ते एकवटले आणि त्यांचीही घोषणाबाजी सुरु झाली.

मुलुंडमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर तणाव निर्माण झाला..त्याचवेळी गृहमंत्री फडणवीस त्याच कार्यालयात आले. फडणवीस फोन वरुन बोलतानाही दिसले. काही वेळानंतर कार्यालयातून निघाले.

उत्तर पूर्व मुंबईत भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा थेट सामना आहे. मीहिर कोटेचा यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय दिना पाटील आहेत. मात्र मतदानाच्या 2-3 दिवसांआधीच पैसे वाटपाचा आरोप ठाकरे गटानं केलाय. दुसरीकडे ज्या वस्त्यांमधून आपल्याला मतदान होणार नाही, अशा ठिकाणी भाजपकडून तिथल्या मतदारांच्या बोटांवर आधीच शाई लावली जात असल्याचा सनसनाटी आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.

मतदानाचा अंतिम टप्पा मुंबईत आहे. सोमवारी 20 तारखेला मतदान होणार आहे. पण त्याआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे सुरु झाले आहेत.

दबाव निर्माण केला गेला आहे- संजय दिना पाटील

मुलुंड राडा प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पाच ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आज मुलुंड पोलिसांनी मुलुंड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील देखील या ठिकाणी या अटक झालेल्या आंदोलकांची भेट घेण्यास आले होते. ही अटक चुकीची आहे, स्वतः उपमुखमंत्री इथे आले मग समजून जा, घटनेत पोलिसांना अजून वीस ते पंचवीस आंदोलकांचा शोध घेणे आहे. मात्र ही अटक चुकीची असून दबाव निर्माण केला गेला आहे. पण निवडून आम्हीच येऊ अशी प्रतिक्रिया यावेळी संजय दिना पाटील यांनी दिली.