महाराष्ट्रातील 5 वा आणि अंतिम टप्प्यातील प्रचार थांबला, सोमवारी मतदान

| Updated on: May 18, 2024 | 8:51 PM

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही पूर्ण ताकदीनं प्रचार केला. आता मुंबईकर फैसला सोमवारी मतदानातून करतील. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

महाराष्ट्रातील 5 वा आणि अंतिम टप्प्यातील प्रचार थांबला, सोमवारी मतदान
Follow us on

महाराष्ट्रातील 5 वा आणि अंतिम टप्प्यातील प्रचार थांबला आहे. आता सोमवारी मुंबईतल्या 6 जागांसह एकूण 13 मतदारसंघात मतदान होईल. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरे बंधू आमने-सामने आलेत. आज प्रचार थांबण्याआधी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यावर चांगलेच तुटून पडले. मुंबईत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार ताकद लावली. प्रचार सभाही झाल्या आणि रोड शोही झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मनसेच्या शाखांना भेटी दिल्यात. महायुतीला पाठिंबा देवून प्रचार केल्यानंतर राज ठाकरेंनी मनसेच्याही शाखा शाखांमध्ये जावून पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि चर्चाही केली.

मुंबईच्या निकालाकडे नजरा

शेवटच्या टप्प्यातल्या मतदानात, मुंबईकडे खास नजरा लागल्या आहेत. कारण शेवटच्या टप्प्यातली लढाई उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आहे. मुंबईतल्या 6 जागांसाठी, महायुती आणि महाविकास आघाडीत काट्याची टक्कर आहे. त्यामुळं शेवटच्या दिवशीही उद्दव ठाकरेंनी विक्रोळी, अंधेरीत सभा आणि रोड शो करत शाखांनाही भेटी घेतल्या. ठाकरेंनी प्रचार थांबेपर्यंत मुंबईत 4 सभा घेतल्या आणि राज ठाकरेंचा समाचार घेतला.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला..शुक्रवारी मोदी आणि राज ठाकरे शिवाजी पार्कात एकाच मंचावर होते. त्यावरुन एक ठाकरे भाड्यानं घेतला, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केलीये.

राज ठाकरेंकडून महायुतीचा प्रचार

लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सहभागी झाली नसली तरी स्वत: राज ठाकरेंनी महायुतीचा जोरदार प्रचार केला आणि पंतप्रधान मोदींसोबत सभाही घेतली. विशेष म्हणजे शिवाजी पार्कातल्या सभेत राज ठाकरेंना खास ट्रिटमेंट मिळाली. फडणवीस आणि शिंदेंच्या नंतर म्हणजेच मोदी मंचावर आल्यावरच राज ठाकरेंचं भाषण झालं आणि त्यानंतर मोदी बोलले. म्हणजेच महायुतीत मनसेचा समावेश ही फक्त आता औपचारिकता राहिलीये.

मराठीला अभिजात भाषेसह 6 मागण्याही राज ठाकरेंनी मोदींसमोर केल्या आणि भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींचा तिसऱ्यांदा होणारे पंतप्रधान असा उल्लेखही केला. मुंबईत 6 पैकी 3 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे. त्यामुळं शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदेंसमोरही आव्हान आहे.

मुंबईत सोमवारी मतदान

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मुंबईत रोड शो केले. प्रचार थांबण्याआधी शिंदे बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर पोहोचले. बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. तसंच शिवाजी पार्कातल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यालाही हार अर्पण केला. तर, सभा आटोपून उद्धव ठाकरेंनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं.