मुंबई : मागच्या काही महिन्यात ज्या नेत्यांसोबत दुर्घटना घडल्या, त्या घटनांच्या संबंधांच्या चर्चेवर ‘सामना’ दैनिकात अग्रलेख छापून आलाय. ज्यात राज्यात घडलेले काही अपघात आणि त्या अनुषंगानं जादूटोणा-लिंबू मिर्ची-टाचण्यांच्या होणाऱ्या चर्चेवर बोट ठेवलं गेलंय. आणि त्या लेखाचा रोख थेट शिंदे गटाकडे (Shinde Group) आहे. शिंदे सरकार स्थापनेवेळी गुवाहाटीची कामाख्या देवीचा नवस चर्चेत राहिला. नवस पूर्ण झाल्यास कामाख्या देवीला रेड्याचा बळी देण्याची प्रथा आहे. त्यावरुनच ‘सामना’नं शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे जादूटोणा- लिंबू-मिर्ची प्रथांना हातभार लावला जात असल्याचं म्हटलंय. शिवसेनेचं मुखपुत्र ‘सामना’मध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि गटाचे 40 आमदार गुवाहाटीला गेले. तिथं त्यांनी जादूटोण्याचे विधी आणि रेड्याचा नवस दिल्याचे बोलले जाते, असं लिहिलं गेलंय.
अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली, त्यात ते बालंबाल बचावले. बीडमध्ये धनंजय मुंडे अपघात झाला. त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आणि मुंडेंच्या बरड्यांना दुखापत झालीय.
पुण्यातल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे साडीनं पेट घेतला. प्रहारचे नेते बच्चू कडूंचा अपघात झाला. नागपूर अधिवेशनावेळी अपघातात काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांचा उजवा खांदा निखळला.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचं अपघाती निधन झालं. जयकुमार गोरेंचा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ खडसेंच प्रकृती पुन्हा बिघडलीय., आणि सध्या ते रुग्णालयात आहेत.
सामनानं या साऱ्या घटनांचा संबंध अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या कथित नवस-सायासाची जोडल्याचं दिसतंय. विरोधकांना अचानक दवाखान्याच्या खाटांवर खिळवणारी मालिका काय सांगते? असा प्रश्न विचारण्यात आलाय.
अजित पवार लिफ्ट दुर्घटनेतून वाचले, ते पुरोगामी विचारांचे असले तरी ‘सामना’च्या मते त्यांचे लोक म्हणतात की काहीतरी गडबड आहे. भाजपविरोधी बोलू लागल्यावर विनायक मेटे अपघाती मरण पावले. वर्षावर मुख्यमंत्रीपदाच्या शेवटच्या काळात उद्धव ठाकरेंना भयंकर आजार झाले. म्हणजे महाराष्ट्रातील ‘करणी टोळी’चे अघोरी प्रयोग आधीपासूनच सुरु होते. ही अंधश्रद्धा असली तरी लोकांच्या मनात ते घट्ट बसतंय, असा दावा करण्यात आलाय.