मुंबई : नवीन वर्ष सुरु होताच, ‘सामना’तून शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं. आणि सरकारच्या डेडलाईनवरुनही भाकीत करण्यात आलंय. नव्या वर्षात बेकायदेशीर सरकार घरी जाणार असा दावाच ठाकरे गटानं केलाय. नवीन वर्षांच्या पहिल्याच तारखेला, विरोधकांनी सरकार जाणार असं सांगत महिनाही फिक्स केलाय. अर्थसंकल्पीय अधिवेशन सरकार पाहणार नाही, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी म्हटलंय. तर ‘सामना’तून वर्षाच्या पहिल्याच दिवशी, मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार आणि सरकार जाणार असं भाकीत केलंय.
“महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडले, हा राजकीय बळजोरीचा प्रकार होता. शिवसेनाही फोडली. हे सर्व मावळत्या वर्षात घडले. मावळत्या वर्षात महाराष्ट्राने एक बेकायदेशीर सत्तांतर पाहिले. 16 आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. सर्व काही कायद्याने झाले. तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील व नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल’, असं संज राऊतांनी ‘सामना’मध्ये म्हटलंय.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच, राऊतांनी फेब्रुवारी महिनाही सरकार पाहणार नाही, असं राऊत म्हणाले होते.
हे झालं राऊतांचं. पण राष्ट्रवादी काँग्रसेच आमदार अमोल मिटकरींसह एकनाथ खडसेंनीही सरकार कोसळणार असा दावा केलाय. तर शिंदे गटानं मुंगेरी लाल के हसीन सपने म्हटलंय.
सरकार पडणार असे दावे आणि भाकीतं हिवाळी अधिवेशनाआधीही झालीत. त्यावरुन विरोधकांना स्वत: मुख्यमंत्र्यांनीच अधिवेशनात आव्हानही दिलं होतं.
शिंदे-फडणवीस सरकारकडे 170 आमदारांचा भक्कम पाठींबा आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय शिंदेंच्या विरोधात गेला तरच सरकार कोसळेल.
तसं तर सरकार पडणार असे दावे विरोधक करतच असतात. गेल्या 6 महिन्यात तर काही तसं घडलं नाही. आता नवं वर्ष सुरु झालंय. त्यामुळं विरोधकांच्या दाव्यात किती दम आहे की फक्त हवाबाजी हे दिसेलच.