मुंबई: राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha election) बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न सुरू केले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यसभेत आमचा उमेदवार बिनविरोध राज्यसभेत पाठवा. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही तुमचा उमेदवार बिनविरोध निवडून आणू, असा प्रस्ताव आघाडीकडून भाजपला दिला. त्यावर तुम्ही आम्हाला राज्यसभेसाठी पाठिंबा द्या. विधान परिषदेला आम्ही तुम्हाला मदत करू, असा उलट प्रस्ताव भाजपने आघाडी नेत्यांना दिला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी आपआपल्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करायचं ठरलं, असं सांगतानाच दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व चित्रं स्पष्ट होईल, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, शिवसेना नेते अनिल देसाई आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी पाचही नेत्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तासभर चर्चा झाली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील चर्चेचा तपशील सांगितला. राज्यसभेवर पाच उमेदवार निवडून दिल्यानंतर उरलेल्या मतांची संख्या महाविकास आघाडीकडे जास्त आहेत. त्यामुळे त्यांना सांगितलं आम्हाला ही संधी द्या. आमचा एक उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध पाठवू. तुम्ही माघार घ्या. एमएलसीच्या वेळी आपण त्याची भरपाई करू, असं भुजबळ म्हणाले.
आमचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपने त्यांचा प्रस्ताव दिला. तुम्ही जो प्रस्ताव दिला, तो उलटा का करू नये? असं भाजपने सांगितलं. आम्ही राज्यसभेची जागा सोडावी. त्याबदल्यात तुम्ही विधानपरिषदेची जागा सोडणार आहात. त्यापेक्षा तुम्हीच आम्हाला राज्यसभेची जागा सोडल्यास आम्ही तुम्हाला विधान परिषदेची जागा सोडू असं भाजपने आम्हाला सांगितलं. त्यावर आम्ही म्हटलं राज्यसभेत तुमचे भरपूर माणसं आहेत. आमचे कमी आहेत. आमचा एखादा मनुष्य राज्यसभेवर गेला तर बरं होईल. तेवढीच आमची एकने संख्या वाढेल, असं भुजबळ यांनी सांगितलं.
यावेळी चर्चा चांगली झाली. हसतखेळत झाली. परंतु 3 वाजेपर्यंत उमेदवारांना माघार घ्यायची आहे. आम्हीही आमच्या नेत्यांना विचारू आणि भाजपचा प्रस्ताव सांगू. तेही दिल्लीला बोलतील. आमचाही प्रस्ताव ते दिल्लीत सांगतील. एक दीड तासाने त्यांच्याशी बोलणं होईल. 3 वाजता सर्व चित्रं स्पष्ट होईल. कुणी तरी माघार घ्यावी यासाठी चालेला प्रयत्न आहे, असंही त्यांनी सांगितलं.
निवडणुकीतील आतापर्यंतच्या प्रथा आहेत. राज्यसभा किंवा विधान परिषद आपण बिनविरोध केल्या आहेत. त्यामुळे पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे. त्यामुळे आम्ही पुढाकार घेतला. त्यांनी प्रतिसाद चांगला दिला. आम्ही आमचा प्रयत्न करत राहू, असंही ते म्हणाले.