मुंबई : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. शेतकरी, महिलांसाठी या अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केलीय. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्याची टीका विरोधकांनी केलीय. तसेच राज्य सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी कितपत होते याबाबत विरोधकांना शंका आहे. विशेष म्हणजे राज्याचं अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता विरोधक चांगलेच कामाला लागले आहेत. विधिमंडळाचं आजचं कामकाज संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या गोटात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेला घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या गोटात वेगवान हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपला जंगजंग पछाडणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात सध्या वारंवार बैठकांचं सत्र सुरु झालं आहे.
महाविकास आघाडीची काल नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. विधिमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर महाविकास आघाडी एप्रिल-मे महिन्यामध्ये मोठं काहीतरी करणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज देखील बैठक बोलवण्यात आलीय.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘अजिंक्यतारा’ या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे जवळपास सर्वच दिग्गज नेते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला हजर राहण्याआधी उद्धव ठाकरे यांनी स्वतः नाशिक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी बातचीत केली.
महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या एप्रिल आणि मे महिन्यात राज्याती मोठमोठ्या शहारांमध्ये मोठमोठ्या जाहीर सभा होणार आहेत. या जाहीर सभांमधून महाविकास आघाडीचे नेते भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधणार आहेत. राज्यात महापालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. याशिवाय पुढच्यावर्षी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी सरकार स्थापन करण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी भाजप विरोधात मोर्चा बांधणार आहे. त्याचीच ही सुरुवात असल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडी एप्रिल-मे महिन्यात राज्यभरात संयुक्त जाहीर सभा घेणार आहे. या सभांमध्ये उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार राज्याच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. याच सभांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. या सभांचं नियोजनाचं काम सुरु झालं आहे. या सभांच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठका सुरु आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी महाविकास आघाडीचा येत्या 15 मार्चला मेळावा देखील होणार आहे.