मुंबई : पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मविआचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा जावू शकतात.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही पक्षांचं मिशन सध्या एकच आहे, लोकसभेची निवडणूक. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर, महाविकास आघाडीनं यापुढच्या निवडणुका एकत्रच लढण्याचा निर्धारही केलाय आणि त्यासाठीच 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत त्यापैकी ठाकरे गटाला 21 जागा राष्ट्रवादीला 19 जागा आणि काँग्रेसच्या वाट्याला 8 जागा जातील अशी माहिती आहे. अर्थात महाविकास आघाडीच्या बैठकीत ही प्राथमिक चर्चा झालीय. जसजशा निवडणुका जवळ येतील त्यात बदल होऊ शकतो.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मात्र जागा वाटपासंबंधात अजून काहीही ठरलं नसल्याचं म्हटलंय. त्यावेळी 48 जागांपैकी भाजपनं 25 जागा लढल्या होत्या. त्यापैकी भाजपचे 23 खासदार आले तर शिवसेनेच्या वाट्याला 23 जागा आल्या होत्या. त्यापैकी 18 ठिकाणी शिवसेना विजयी झाली होती.
सध्याची जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालीय..त्यावरुन महाविकास आघाडीनं एकत्र लढण्याची तयारी केलीय. नुकत्याच झालेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत त्याची झलक दिसली. लोकसभेच्या निवडणुकीला बरोबर 1 वर्ष बाकी आहे. पण आतापासूनच, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. सध्याची जागा वाटपाची चर्चा ही, त्याच रणनीतीचा भाग आहे.
स्थानिक निवडणूक असो लोकसभा की मग विधानसभा महाराष्ट्रात एक बाब स्पष्ट आहे की, भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्रच लढणार आणि या युतीचा सामना सामना 3 पक्षांच्या महाविकास आघाडीशी होणार. महाविकास आघाडीचे नेतेही हे सार्वजनिकपणे बोलूनही दाखवतायत.
पक्ष म्हटलं की जागा वाटपात रस्सीखेच तर होणारच. पण त्यामुळं महाविकास आघाडीवर परिणाम होऊ देणार नाही, हे अजित पवारांनी बोलून दाखवलंच आहे.