सत्ताधारी पक्षांचे प्रमुख नेते चंद्रकांत पाटील यांच्या घरी एकवटले, हालचाली वाढल्या

| Updated on: Sep 12, 2023 | 7:53 PM

विरोधी पक्षांच्या गोटात सुरु असलेल्या हालचालींची चाहूल लागल्यानंतर आता सत्ताधारी पक्षांच्या गोटातही हालचालींना वेग आलाय. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

सत्ताधारी पक्षांचे प्रमुख नेते चंद्रकांत पाटील यांच्या घरी एकवटले, हालचाली वाढल्या
Follow us on

मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन झालीय. या इंडिया आघाडीच्या पाटणा, बंगळुरु आणि मुंबईत तीन मॅरेथॉन बैठका पार पडल्या आहेत. या आघाडीची समन्वय समिती तयार झालीय. या समितीची उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रणनीती आखण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्ष कामाला लागलेले असल्यामुळे महायुतीतदेखील हालचालींना वेग आलाय. मुंबईत महायुतीची आज महत्त्वाची बैठक पार पडलीय.

भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही पक्षांची मुंबईत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडलीय. या बैठकीला तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. या बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकी काय-काय चर्चा झाली, या विषयी माहिती दिली. विशेष म्हणजे महायुतीची याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली होती. या बैठकीचा देखील आशिष शेलार यांनी उल्लेख केला.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

“आज महायुतीच्या तीनही पक्षांची समन्वय समितीची बैठक ठरल्याप्रमाणे झाली. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार आज ही बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर झाली”, असं आशिष शेलार म्हणाले.

“विशेष रुपाने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकींचा पूर्ण विचार करताना पूर्ण राज्यांमध्ये 48 लोकसभा क्षेत्रांवर पूर्ण लक्ष केंद्रीत करुन 45 आणि त्यापेक्षा जास्त जागा निवडून येण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीतील काही विषयांवर निर्णय घेणं अपेक्षित होतं. त्यामुळे या बैठकीत काही निर्णय घेण्यावर चर्चा झाली”, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

“या बैठकीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघाचा विचार करुन 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात महायुतीकडून ताकद लावली जाणार आहे”, असंदेखील आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं.