एनडीए असो की यूपीए ओबीसींना न्याय हक्क मिळाला नाही; महादेव जानकरांचा भाजपला घरचा आहेर

| Updated on: Jul 04, 2021 | 11:44 AM

ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार निदर्शने करण्यात आली. ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही. ( mahadev jankar)

एनडीए असो की यूपीए ओबीसींना न्याय हक्क मिळाला नाही; महादेव जानकरांचा भाजपला घरचा आहेर
mahadev jankar
Follow us on

मुंबई: ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार निदर्शने करण्यात आली. ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा देतानाच एनडीए असो की यूपीए ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही, असा घरचा आहेरच महादेव जानकर यांनी भाजपला दिला आहे. जानकर यांनी थेट भाजपला हा टोला लगावल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. (mahadev jankar protest in mumbai for obc reservation)

महादेव जानकर यांच्या नेतृत्वात रासपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मानखुर्द येथे प्रचंड चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी जानकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून भाजपलाही दोषी धरले. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा जानकर यांनी दिला.

जातीनिहाय जनगणना करा

ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांना निधी मिळाला पाहिजे. तसेच ओबीसींना त्यांची आर्थिक आणि सामाजिक भागीदारी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे, असं सांगतानाच एनडीए असो की यूपीए… दोघांनीही ओबीसींना पाहिजे त्यांना हक्क दिलेला नाही, असा दावा त्यांनी केला.

जानकर पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, जानकर यांच्या नेतृत्वात मानखुर्द येथे प्रचंड आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. हातात पिवळे झेंडे घेऊन रासप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलकांनी वाहतूक कोंडी केल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वरिष्ठ पोलिसांनी जानकरांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तर अर्ध्या तासानंतर आंदोलन मागे घेतो. शांततेत आंदोलन करत आहोत. कुणालाही त्रास द्यायचा नाही, आम्हाला फक्त आमचं म्हणणं मांडायचं आहे, असं जानकर पोलिसांना सांगत होते. मात्र, आंदोलन अधिकच आक्रमक झाल्याने अखेर पोलिसांनी जानकर यांच्यासह त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. रासपने आज राज्यातील 36 जिल्ह्यात आंदोलन केलं. जेलभरो आणि चक्काजाम करत रासपच्या कार्यकर्त्यांनी आपला निषेध नोंदवला. (mahadev jankar protest in mumbai for obc reservation)

 

संबंधित बातम्या

ओबीसींच्या आरक्षणासाठी आता महादेव जानकर मैदानात; रविवारी राज्यभरात चक्काजाम

पाच वर्षात काय दिवे लावलेत ते चंद्रकांतदादांनी सांगावं; पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ, पंकजा मुंडे, पटोले, संजय राठोड एकाच मंचावर येणार?; वडेट्टीवारांनी बोलावली ‘चिंतन’ बैठक!

(mahadev jankar protest in mumbai for obc reservation)