मुंबईः विधीमंळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Assembly) यंदा जनतेच्या प्रश्नांच्या तुलनेत कुत्र्या-मांजरांच्या आवाजानेच जास्त गाजलं. हा सर्व प्रकार अत्यंत लज्जास्पद असल्याचे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदारांचे कान टोचले. ज्या लाखो मतदारांनी विश्वास टाकल्यानंतर आमदार (Maharashtra MLA) इथपर्यंत पोहोचतात, त्यांनी हे लक्षात ठेवावे की, आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचं प्रतिनिधीत्व करत नाहीत. असे वागलात तर लाखो मतदारांच्या विश्वासाला तडा जाईल. सदस्यांनी आपण काय बोलतोय, याचे भान ठेवा, असे खडे बोल अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना सुनावले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘ आपण इथे कुत्री, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाहीत, याची जाणीव ठेवली पाहिजे. प्राण्यांचा आवाज काढणं हा मतदारांच्या विश्वासाला तडा जाणं आहे. त्यांचा अपमान करणं आहे. मतदारांना काय वाटेल, आपला माणूस तिथं जातो आणि अशा पद्धतीनं आवाज काढतो, टवाळी करतो? त्यामुळे सगळ्यांनीच चारही प्रमुख प्रक्ष, इतर अपक्ष सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्यानं घेतली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून आमदारांच्या बेताल वक्तव्यांबद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ विधीमंडळाचा सदस्य सभागृहात कसा वागतो, कसा बोलतो, आवारात त्याचं वर्तन कसं आहे. सार्वजनिक जीवनात कसा वावरतो, या सगळ्यावर त्याची स्वतःचीच नाही तर विधीमंडळाची प्रतिमा ठरत असते. याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. गेल्या काही वर्षात सभागृहातील सदस्यांच्या वर्तनामुळे आपल्या सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच धक्का पोहोचला आहे. ही प्रतिमा आणखी ढासळू नये, तिला उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
संसदीय सदाचार आणि शिष्टाचाराची आचारसंहिता यावरील पुस्तक सर्वांनी वाचावं असा सल्ला यावेळी अजित पवार यांनी सर्व आमदारांना दिला. ते म्हणाले, आपण सर्वांनी सभागृहाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विधीमंडळाच्या आवारात, सार्वजनिक जीवनातील स्वतःच्या वर्तनात अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. सकाळच्या बैठकीला सदस्यांच्या वर्तनात सुधारणा झाली पाहिजे यावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, थोरात, अनिल परब, जयंत पाटील अनेक गटनेत्यांनी सहमती दर्शवली. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सभागृहाचं कामकाज. विधीमंडळाचं थेट प्रक्षेपण जगभरात होत असतं. त्यामुळे विधीमंडळाच्या सदस्याचं वर्तन शोभेल, साजेल, इतर कुणाचा अपमान, अवमान, उपमर्द होणार नाही, असं ठेवलं पाहिजे. संसदीय सदाचार, शिष्टाचाराची आचारसंहिता हे पुस्तक सर्वांनी वाचलं पाहिजे.’
इतर बातम्या-