महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा लढाव्यात आणि सर्वाधिक जागांवर जिंकून यावं, असा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. काँग्रेस पक्ष हा राज्यात महाविकास आघाडीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश आलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली जात आहे. असं असलं तरीही काँग्रेसमध्ये काही समस्या देखील आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटिंग झालेलं बघायला मिळालं. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बरोबर हेरलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांनी या आमदारांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर आता कारवाई अटळ आहे. या दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सर्व जिल्ह्याध्यक्षांची बैठक दादर येथील टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय-काय चर्चा झाली, याबाबतची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.