महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल कल्याण ग्रामीणमधून विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. राजू पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटनादरम्यान बोलताना राज ठाकरे यांनी यादी लवकरच जाहीर होईल असं सांगितलं होतं. त्यानंतर आज उशिरा रात्री मनसेची यादी जाहीर झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मनसेकडून अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीममधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागच्या निवडणुकीत मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. पण यंदा मात्र वरळीमधून मनसेने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेकडून माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ते निवडणूक लढवणार आहेत. 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती आणि विजय देखील मिळवला होता. या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. त्यामुळे येथे तिंरगी लढत पाहायला मिळू शकते. अमित ठाकरे यांच्याविरोधात ठाकरे गट उमेदवार देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. सोमवारी राज ठाकरे यांनी ठाण्यातून अविनाश जाधव यांची ही घोषणा केली होती. अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरेंसाठी महायुतीकडून पाठिंबा दिला जाऊ शकतो. कारण राज ठाकरे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याचं देखील बोललं जात आहे. बैठकीत राज ठाकरे यांनी माहीम ऐवजी शिवडी आणि वरळी विधानसभा मतदारसंघात पाठिंबा मागितल्याचं बोललं जातंय. जर महायुतीने मनसेला पाठिंबा दिला तर ही लढत आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी होण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे महायुती देखील मनसेच्या काही उमेदवारांना पाठिंबा देणार का याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. माहीमची निवडणूक बिनविरोध होणार की ठाकरे आपला उमेदवार देणार याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.