Assembly Session: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आजच पार पडणार?

| Updated on: Jul 06, 2021 | 12:33 PM

Assembly Session | भाजपच्या 12 आमदारांचे सभागृहातून वर्षभरासाठी निलंबन केल्यानंतर महाविकासआघाडी सरकारकडून आणखी एक डाव खेळला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकारकडून मंगळवारीच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आटोपला जाण्याची शक्यता आहे.

Assembly Session: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आजच पार पडणार?
विधानसभा अध्यक्ष
Follow us on

मुंबई: भाजपच्या 12 आमदारांचे सभागृहातून वर्षभरासाठी निलंबन केल्यानंतर महाविकासआघाडी सरकारकडून आणखी एक डाव खेळला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकारकडून मंगळवारीच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा  कार्यक्रम आटोपला जाण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या विधानसभेच्या (Assembly Session) आतला आणि बाहेरचा गदारोळ बघता ही शक्यता कमी वाटत आहे.  (Maharashtra Assembly Speaker election today all you need to know)

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार? पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.

विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला?

काँग्रेस आणि शिवसेनेत देवाणघेवाणीची प्राथमिक चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली होती. काँग्रेसनं उपमुख्यमंत्रीपदामध्ये रस दाखवल्याचं कळतंय. त्यासाठी शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता त्यावेळी व्यक्त केली जात होती. दरम्यान, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली. तेव्हा सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत, ते संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करतो, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काही फेरबदल होऊन शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळेल का? याबाबत कुणाचीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही.

‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं वाटत नाही’

देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनापूर्वीच विधानसभा अध्यक्षपदाची निवड इतक्यात होणार नाही, असे म्हटले होते. तुमच्याकडे बहुमत आहे तर एवढं महत्त्वाचं पद रिकामं का ठेवत आहात? ते भरत का नाही? असा सवाल करतानाच आता जी परिस्थिती दिसते, त्यात काही बदल झाला नसेल तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले होते.

 

संबंधित बातम्या:

राज्यपालांनी 12 रोखले, भास्कर जाधवांनी 12 ‘बाद’ केले, भाजपानं आयती संधी दिली? वाचा सविस्तर

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय ठाकरे सरकारनं का घेतला? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचं मत

ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला, दुसरं काय? ‘केले तुका झाले माका’; राऊतांचा निशाणा

(Maharashtra Assembly Speaker election today all you need to know)