विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणातील याचिकांच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. विधानसभा अध्यक्ष 30 ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक जाहीर करु शकले नाहीत तर कोर्टाला वेळापत्रक ठरवावं लागेल, असा इशारा कोर्टाने दिलाय. तसेच विधानसभा अध्यक्षांना ही शेवटची संधी असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता चांगलेच कामाला लागले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोर्टाच्या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेतली. तसेच त्यांची पुढचं कामकाज कसं असणार आहे? याबाबत महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलीय.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेतली. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आमदार अपात्रतेच्या 34 याचिकांना 6 याचिकांमध्ये एकत्र करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला. तसेच विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला कागदपत्रे जमा करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंतची वेळ वाढवून दिली. तर ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टात जमा केलेली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले. त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑक्टोबरला होईल, असं राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं.
विशेष म्हणजे याप्रकरणी सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे नवे वेळापत्रक दसऱ्यानंतर तयार होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांच्यासोबत याच आठवड्यात चर्चा करणार आहेत. यावेळी ते वेळापत्रक ठरवण्याबाबत महत्त्वाचा सल्ला घेणार आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष दसऱ्यानंतर दिल्ली दौर्यावर जाणार आहेत. ते देशाचे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांचीही घेणार भेट घेणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष दोन्ही भेटी याच आठवड्यात घेणार आहेत. नवे वेळापत्रक तयार करण्यासाठी दोन्ही कायदा तज्ज्ञांसोबत विधानसभा अध्यक्ष करणार चर्चा आहेत. त्यानंतर येत्या 30 ऑक्टोबरला नवे वेळापत्रक तयार करण्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीवेळी नवे वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून सुप्रीम कोर्टात सादर केलं जातं का? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.