कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : आमच्याकडून पक्ष आणि पक्ष चिन्ह काढून घेतल्याने आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात गेलो. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या निकाल देताना इकडे काही वेडंवाकडं केलं तर आम्ही कोर्टात जाऊ. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, असा इशारा देतानाच त्यानंतर जी बदनामी होईल, त्यामुळे यांना जगात तोंड दाखवायाल जागा राहणार नाही. अध्यक्षांनी परदेशातून यावं आणि निकाल लावावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.
राज्यात जी काही बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर कोर्टाने परखड भाष्य केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना मराठी माणसासाठी आणि हिंदुच्या रक्षणासाठी स्थापन करून जपली. अशी शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून आपल्या दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला आहे. हिंदुत्वाच्या बुरख्या खालचा भेसूर चेहरा उघडा पाडला आहे. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काही जणांनी काल आनंदोत्सव साजरा केला. भाजपने आनंद साजरा केला ते समजू शकतो. कारण डोईजड झालेलं ओझं उतवरण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. पण गद्दारांना आनंद होण्याची गरज काय? असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाने जो पोपट ठेवला आहे. तो हालत नाही. निश्चल आहे. तो बोलत नाही हे सांगून तो मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम विधानसभा अध्यक्षांकडे दिलं आहे. नार्वेकरांना राजकीय प्रवासाची कल्पना आहे. तो कसा करायचा हे त्यांना चांगलं कळतं. जगात महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे. ती अधिक होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मेलेला पोपट हातात घेऊन पाठीमागून मिठू मिठू करणारे आहेत. जीवदान मिळालं ते तात्पुरतं आहे. कोर्टाने अध्यक्षांना रिझनेबल टाइम दिला आहे. बेकायदेशीर सरकारने राजीनामा दिला पाहिजे. मी राजीनामा दिला नसता तर मुख्यमंत्री झालो असतो. पण मला त्यात स्वारस्य नव्हतं. कोर्टाने लक्तरे धिंडवडे काढल्यानंतर निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे. जनतेच्या न्यायालयात जायला काय हरकत नाही. एकनाथ शिंदे यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे, असंही ते म्हणाले.