मुंबई : लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज राज्यात बंद पुकारण्यात आला आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी रस्त्यावर उतरुन या आंदोलनही केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर घणाघाती टिका केली. तसेच, लखीमपूर घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्राला भाजप वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, गुन्हेगारावर 302 अंतर्गत तात्काळ कारवाई करा आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना तातडीने मंत्रिमंडळातून काढण्यात यावे ही मागणी देखील यावेळी त्यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
लखीमपूर येथे केंद्रातल्या गृह राज्यमंत्री ज्यांच्यावर खुनाचे हायकोर्टात ट्रायल सुरुये, त्यांच्यावर नेपाळ आणि भारतात स्मगलिंग केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. अशा अजय मिश्रा नावाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं त्यामध्ये दुर्दैवी घटना घडली
या घटनेनंतर आमच्या नेत्या प्रियांका गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं, किडण्याप करण्यात आलं आणि कुठल्याही न्यायालयासमोर त्यांना हजर न करता ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम, ज्या प्रकारे एका महिलेला भाजपने त्रास दिला तेही देशाच्या लोकांनी पाहिलं.
आशिष मिश्राला अटक केली पण, त्याला कुठलाही पिसीआर न घेता न्यायालयीन कोठडीत टाकणे म्हणजे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यावर 302 अंतर्गत तातडीने कारवाई व्हावी, तसेच, अजय मिश्रा यांना तातडीने मंत्रिमंडळातून काढण्यात यावे ही मागणी आज काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशभरात केली जात आहे
महाराष्ट्र बंदचा नारा महाविकास आघाडीने लावला आहे. त्यामध्ये संपू्रण महाराष्ट्र या दुर्दैवी घटनेविरोधात महाराष्ट्र बंद आहे. व्यापारीही यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. कारण, नरेंद्र मोदींचं भाजपचं सरकार केंद्रात आल्यानंतर व्यापाऱ्यांनाही जीएसटीच्या माध्यमातून चिरडण्याचं काम, छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्याचं काम भाजपच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे व्यापार, अनेक उद्योग असतील त्यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. त्याबाबत त्यांचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने धन्यवाद करतो आणि राज्याच्या जनतेला त्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्याबाबत आभार व्यक्त करतो.
हा बंद महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने होतोय हा केंद्रातील अत्याचारी भाजप सरकारला खऱ्या अर्थाने एक धडा आहे, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारकडून आम्ही मांडतो आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra Bandh : लोकल, रेल्वे सेवा सुरु; खाजगी वाहतूक बंद, वाचा राज्यात काय सुरु, काय बंद?